कर्जत: किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर समाजात आजही अनेक गैरसमज आणि संकोचाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ कर्जत सि

कर्जत: किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर समाजात आजही अनेक गैरसमज आणि संकोचाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी आणि महात्मा गांधी विद्यालय माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘किशोरी आरोग्य व शारीरिक स्वच्छता’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कर्जत शहरात गेली ४५ वर्षे वैद्यकीय सेवा देत असलेल्या ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. (श्रीमती) विद्या काकडे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. विद्या काकडे यांनी केवळ व्याख्यान न देता प्रत्येक विद्यार्थिनीपर्यंत जाऊन त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. किशोरवयात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छतेची काळजी, संतुलित आहार, रक्तक्षय (Anemia) टाळण्यासाठी आवश्यक पोषण, वैयक्तिक स्वच्छता तसेच आरोग्यविषयक समस्यांबाबत कोणताही संकोच न बाळगता पालक किंवा डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. अनेक विद्यार्थिनींच्या वैयक्तिक शंकांचेही त्यांनी निरसन केले.
यावेळी बोलताना डॉ. काकडे म्हणाल्या की, “किशोरवय हा मुलींच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा आहे. या वयात योग्य आरोग्य शिक्षण आणि वैज्ञानिक माहिती मिळाल्यास भविष्यातील अनेक आरोग्य समस्या टाळता येतात. त्यामुळे प्रत्येक मुलीने स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.”
रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीने सामाजिक बांधिलकी जपत मुलींच्या आरोग्याचा महत्त्वाचा विषय हाती घेतल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना आत्मविश्वासाने जगण्याची प्रेरणा देण्याचा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी दिशादर्शक ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष अनिल तोरडमल, सचिव संतोष सुरवसे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार चौरे, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य रो. संजय नगरकर, राजळे, समर्थ विद्यालयाचे प्राचार्य रो. उपमन्यु शिंदे, रो. राऊत, रो. नितीन देशमुख, रो. शहबाज अत्तार, रो. जगदाळे, रो. घनश्याम नाळे यांच्यासह शिक्षक, रोटेरियन आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS