पाथर्डी: "गुरु म्हणजे केवळ धडा शिकवणारा शिक्षक नव्हे; तर विद्यार्थ्याच्या आयुष्याला दिशा, व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा आणि माणूसपण जागवणारा दीपस्

पाथर्डी: “गुरु म्हणजे केवळ धडा शिकवणारा शिक्षक नव्हे; तर विद्यार्थ्याच्या आयुष्याला दिशा, व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा आणि माणूसपण जागवणारा दीपस्तंभ होय,” असे प्रतिपादन पार्थ नगरीचे नगराध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले. पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर, पाथर्डी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना अभय आव्हाड म्हणाले की, भारताची ओळख जगाला विविधतेने नटलेली संस्कृती, समृद्ध अध्यात्म, महान संतपरंपरा आणि हजारो वर्षांची ज्ञानपरंपरा ही आपल्या देशाची खरी संपत्ती आहे. या ज्ञानपरंपरेचा आत्मा गुरु या संकल्पनेत वसलेला आहे. भारतीय संस्कृतीने गुरुचे स्थान अत्यंत उच्च मानले आहे. म्हणूनच आषाढ पौर्णिमेला साजरी होणारी गुरुपौर्णिमा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, ती ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे.
एक चांगला शिक्षक विद्यार्थ्याला फक्त परीक्षेत गुण मिळवण्यासाठी तयार करत नाही, तर तो आयुष्याच्या परीक्षेसाठी घडवतो. अपयशाने खचलेल्या विद्यार्थ्याच्या पाठीवर विश्वासाने ठेवलेला शिक्षकाचा हात त्याला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतो. म्हणूनच शिक्षकांना समाजाचे शिल्पकार म्हटले जाते, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, अनुलोम संस्थेच्या तालुकाप्रमुख मेघा चिंतामणी, मुख्याध्यापक शरद मेढे, ज्ञानेश्वर गायके, अनुजा कुलकर्णी, संपत घारे, रेश्मा सातपुते, शितल आंधळे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी बालवाडी विभागात विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा पाद्यपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यामुळे सर्व पालक भावुक झाले होते. तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागात आयोजित वकृत्व स्पर्धेत विद्यालयातील ६७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

COMMENTS