Homeताज्या बातम्या

एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री सरनाईक यांचा निर्णय

मुंबई: राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधून शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक करण्यात आलेल्या 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड

प्रशासनाचा ’कागदी’ उत्सव नि अन्यायाचा ’अदृश्य’ आक्रोश! किनवटमध्ये ’महसूल सप्ताहा’ची आतषबाजी; पण सामान्यांच्या पदरी लालफितीचा आणि लाचखोरीचा अंधार!
कारगील विजय दिनानिमित्त वीर योद्ध्यांना श्रद्धांजली; राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांकडून शहीद वीरांना कृतज्ञ अभिवादन
स्व. अजित पवार व घुले पाटलांचे जिव्हाळ्याचे नाते होते : पाऊलबुद्धे
STचा प्रवाशांना मोठा दिलासा! NCMC स्मार्ट कार्डसाठी आता १ सप्टेंबरपर्यंत  मुदतवाढ Maharashtra Marathi News | big relief for st bus passengers now  NCMC smart card deadline extended till ...

मुंबई: राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधून शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक करण्यात आलेल्या ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ची (NCMC) अंमलबजावणी आता १ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप हे ओळखपत्र प्रत्यक्षात मिळाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य शासनामार्फत ‘अमृत ज्येष्ठ नागरिकांना’ मोफत प्रवासाची सुविधा, तसेच इतर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलती अधिक पारदर्शक, सुलभ आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात, यासाठी १ ऑगस्टपासून ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यभरातील अनेक पात्र प्रवाशांनी नोंदणी पूर्ण केली असली तरी त्यांना अद्याप हे ओळखपत्र मिळालेले नाही.

केवळ ओळखपत्र उपलब्ध नसल्यामुळे पात्र लाभार्थी शासनाच्या सवलतीपासून वंचित राहू नयेत, याची दखल घेत अंमलबजावणीस एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “राज्य परिवहनची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. तांत्रिक अथवा प्रशासकीय कारणांमुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक किंवा महिला प्रवाशाला अडचणींचा सामना करावा लागू नये, ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे ओळखपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय १ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.”

या निर्णयामुळे अद्याप ओळखपत्र न मिळालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक, इतर ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वाढीव मुदतीचा लाभ घेऊन पात्र प्रवाशांनी आवश्यक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून ओळखपत्र लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावे, असे आवाहनही परिवहन विभागाने केले आहे.

COMMENTS