Homeताज्या बातम्या

किनवटमध्ये ’श्रीराम कृषी सेवा’ची ’विशेष सेवा’: मुदत संपलेल्या औषधावर मार्करची कलाकारी; दाद मागायला गेलेल्या शेतकरी महिलेला शिवीगाळ!

निसर्गाची अवकृपा, खतांचे वाढते दर आणि पिकांवर पडणारी कीड या अस्मानी-सुलतानी संकटांनी आधीच हवालदिल झालेल्या बळीराजाची फसवणूक करण्यासाठी आता बाजारा

प्रशासकीय ढिसाळपणावर आमदारांचा थेट प्रहारजनतेची गैरसोय आता खपवून घेतली जाणार नाही!
भाजपच्या संघटन बांधणीला किनवटमध्ये बळकटी; बाबुराव केंद्रे यांची विधानसभा प्रमुख (बिएलए 1) पदी नियुक्ती
गोकुंदा रेल्वे गेटवर रोज ’चेन पुलिंग’चा उच्छादटवाळखोरांच्या हुल्लडबाजीमुळे रुग्णवाहिका अडकल्या, ठझऋ च्या ढिलाईवर जनतेचा तीव्र संताप!



निसर्गाची अवकृपा, खतांचे वाढते दर आणि पिकांवर पडणारी कीड या अस्मानी-सुलतानी संकटांनी आधीच हवालदिल झालेल्या बळीराजाची फसवणूक करण्यासाठी आता बाजारात नवनवीन ‘कलाकार’ अवतार घेऊ लागले आहेत. किनवट शहरातील श्रीराम कृषी सेवा केंद्राच्या संचालकांनी असाच एक अजब आणि संतापजनक प्रकार करून दाखवला आहे. एका अशिक्षित शेतकरी महिलेच्या पाठीवर प्रेमाचा हात फिरवत चक्क मुदत संपलेले कीटकनाशक तिच्या माथी मारण्याचा महाभाग या दुकानदाराने केला आहे.
तालुक्यातील झेंडीगुडा येथील महिला शेतकरी धुरपताबाई गोबरा रबडे या आपल्या पिकावर फवारणीसाठी औषध खरेदी करण्यासाठी श्रीराम कृषी सेवा केंद्रात गेल्या होत्या. दुकानदाराने अत्यंत हुशारीने कालबाह्य झालेल्या औषधाचा डबा त्यांच्या हातात टेकवला. विशेष म्हणजे, औषधाच्या डब्यावर असलेली मुदत संपल्याची मूळ तारीख उघड्या डोळ्यांना दिसू नये, म्हणून त्यावर काळ्या मार्करने अत्यंत शिस्तबद्ध रीतीने 50 ाश्र असा मोठा फलक लिहून तारीख लपवण्याचा ’कलात्मक’ पराक्रम करण्यात आला. औषध खरेदी करताना बिचार्‍या अशिक्षित महिला शेतकर्‍याला दुकानदाराच्या या ’कलागुणां’ची कल्पना नव्हती. मात्र, घरी जाऊन औषधाचा डबा बारकाईने पाहिला असता, दुकानदाराची ही भामटेगिरी उघडकीस आली. जर हे कालबाह्य औषध पिकावर मारले असते आणि पीक जळून खाक झाले असते, तर त्या होणार्‍या नुकसानीला आणि शेतकर्‍याच्या खिशाला बसणार्‍या भुर्दंडाला जबाबदार कोण? असा रोखठोक सवाल आता उपस्थित केला जात आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धुरपताबाई न्यायाच्या अपेक्षेने पुन्हा दुकानात गेल्या. मात्र, दुकानदाराने आपली चूक मान्य करून समाधान करण्याऐवजी स्वतःचा खरा ’मुजोर’ चेहरा दाखवला. त्यांनी शेतकरी महिलेचे म्हणणे ऐकून न घेता उलट त्यांनाच अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करत दुकानातून हाकलून दिले. शहरात आणि परिसरात या मुजोर कृषी सेवा केंद्र चालकाचा मोठा पसारा आहे. शहरात दोन दुकाने आणि मांडवा येथे मोठे गोडाऊन असल्याची माहिती समोर येत आहे. या गोडाऊनमध्ये कालबाह्य औषधांचा मोठा साठा करून ठेवला गेला आहे. हेच कालबाह्य झालेले औषध अशिक्षित, गरीब आणि गरजू शेतकर्‍यांच्या माथी मारण्याचा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसांपासून सर्रास सुरू असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील दोन्ही कृषी अधिकार्‍यांचा आशीर्वाद आणि पाठबळ असल्याशिवाय इतक्या उघडपणे शेतकर्‍यांची लुटमार आणि फसवणूक चालणे शक्यच नाही, असा थेट आरोप आता शेतकरी वर्गातून केला जात आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाविरोधात धुरपताबाई रबडे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट तालुका कृषी अधिकारी (किनवट) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, या कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या अर्जाच्या प्रती सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार (किनवट) यांनाही सादर करण्यात आल्या आहेत. आता तालुक्यातील कृषी विभाग आणि तालुका प्रशासन या ‘चाणाक्ष’ आणि मुजोर विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई करून कायद्याचा बडगा दाखवते, की नेहमीप्रमाणे त्याला पाठीशी घालून स्वतःचे हात ओले करते, याकडे संपूर्ण किनवट तालुक्यातील बळीराजाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS