नांदेड : भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपत लक्ष्मणराव शेवाळकर यांनी तब्बल 36 वर्षे पोलीस दलात प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि जनसामान्याभ

नांदेड : भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपत लक्ष्मणराव शेवाळकर यांनी तब्बल 36 वर्षे पोलीस दलात प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि जनसामान्याभिमुख सेवा बजावत आदर्श कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या याच उल्लेखनीय सेवेला मानवंदना देण्यासाठी कुंभार समाज यांच्या वतीने हॉटेल सिटी सिम्फनी येथे भव्य कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात शेवाळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ड. संजय रुईकर होते. प्रमुख अतिथी म्हणून विजय देवडे, माजी अध्यक्ष उत्तम मांजरमकर, अंबादासराव राजूरकर, जीवन शेवाळकर, नागनाथ कानगुलवार, नागोराव सिंगरवाड, आत्माराम रावनपल्ले, रमेश नामपले पत्रकार रमेश देवडे, गजानन हिंगमीरे, मातोश्री गंगाबाई लक्ष्मणराव शेवाळकर तसेच शेवाळकर परिवारातील सदस्य उपस्थित होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सकल कुंभार समाज विकास परिषदेतर्फे गणपत शेवाळकर यांना मानपत्र प्रदान करून त्यांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शेवाळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. पोलीस अधिकारी म्हणून कायद्याची कठोर अंमलबजावणी करतानाच सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे, माणुसकी जपणारे आणि समाजहिताला प्राधान्य देणारे अधिकारी म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. विनम्र स्वभाव, सेवाभाव आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्यांनी नागरिकांच्या मनात अढळ स्थान मिळविल्याचे वक्त्यांनी नमूद केले. पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्याबद्दल गणपत शेवाळकर यांना विविध स्तरांवर 151 बक्षिसे व प्रशस्तीपत्रे मिळाली आहेत. ही त्यांच्या प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठ सेवेला मिळालेली मोठी दाद असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पोलीस दलातील जबाबदार्या सांभाळतानाच त्यांनी सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेत समाजऋण फेडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त समाजाने व्यक्त केलेला हा गौरव म्हणजे त्यांच्या कार्याची खरी पोचपावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात ड. संजय रुईकर यांनी शेवाळकर यांच्या कार्याचा गौरव करताना, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि माणुसकी या मूल्यांवर उभे राहून सेवा करणारे अधिकारी समाजासाठी प्रेरणास्थान असतात. गणपत शेवाळकर यांनी आपल्या सेवेतून हाच आदर्श निर्माण केला आहे, असे सांगत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रभावी सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार उत्तम मांजरमकर यांनी केले. मानपत्राचे वाचन बालाजी चक्रधर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शंकरराव कुणापल्ले यांनी केले. या कार्यगौरव सोहळ्यास समाजबांधव, विविध क्षेत्रांतील मान्यवर, हितचिंतक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS