पुणे : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आगामी पुणे दौर्याला
पुणे : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आगामी पुणे दौर्याला काँग्रेसने तीव्र विरोध करण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि गोळीबारासंदर्भात गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यानिमित्त अमित शहा हे 1 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यात येणार आहेत. या दौर्यावेळी काँग्रेसतर्फे तीव्र निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात येईल, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला. मोहन जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या कथित बळाच्या वापरामुळे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जखमी झाले. काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. एका वृत्तप्रतिनिधीलाही कारवाईदरम्यान दुखापत झाल्याचा दावा त्यांनी केला. या घटनेमुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, देशातील शिक्षण व्यवस्था आणि स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. अशा वेळी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारने पार पाडणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई नेमक्या कोणाच्या आदेशाने झाली, याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी द्यावे, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली. दिल्ली पोलिसांचे नियंत्रण केंद्रीय गृह मंत्रालयाकडे असल्याने या प्रकरणातील जबाबदारी टाळता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमित शहा यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली नाही, तर त्यांच्या पुणे दौर्यादरम्यान काँग्रेसतर्फे लोकशाही मार्गाने तीव्र निषेध नोंदविण्यात येईल, असा इशाराही मोहन जोशी यांनी दिला.

COMMENTS