बीड: मातृभूमी प्रतिष्ठान व ज्ञानसागर गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ज्ञानसागर गुरुकुल येथे कारगिल विजय दिन अत्यंत देशभक्तीपूर्ण वातावर
बीड: मातृभूमी प्रतिष्ठान व ज्ञानसागर गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ज्ञानसागर गुरुकुल येथे कारगिल विजय दिन अत्यंत देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वडझरी गावचे सुपुत्र व कारगिल युद्धात शहीद झालेले जवान सुभाष सानप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी शौर्य, धैर्य आणि सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी सैनिक बाजीराव केदार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, कारगिल युद्धामध्ये ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत २६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने कारगिलमधील बर्फाच्छादित शिखरे शत्रूच्या ताब्यातून मुक्त करून तिरंगा अभिमानाने फडकवला. या युद्धात देशाच्या संरक्षणासाठी जवळपास ६०० शूर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिन साजरा केला जातो.
यावेळी त्यांनी कारगिल युद्धातील शौर्यगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. सुभेदार योगेंद्र यादव यांनी १५ गोळ्या लागूनही गंभीर जखमी अवस्थेत टायगर हिलच्या लढाईत दाखवलेल्या अतुलनीय पराक्रमाची माहिती देत त्यांच्या साहसासाठी मिळालेल्या परमवीर चक्राचा गौरव केला. तसेच रणरागिणी येशिका त्यागी, शहीद सुभाष सानप यांच्यासह अनेक वीर जवानांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा दिला. माजी सैनिक केदार यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, देशप्रेम, देशसेवा आणि भारतीय सैन्यातील विविध करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक तथा मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, माजी मुख्याध्यापक दिनकर सानप, लेक लाडकी अभियानचे जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे, सेवानिवृत्त ईपीएस कर्मचारी संघटनेचे सचिव सुदाम कोळेकर आदी मान्यवरांनी कारगिल विजय दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगून उपस्थितांना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा दिली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक ज्ञानसागर गुरुकुलचे संचालक गणेश सानप यांनी केले, तर आभार अमोल तोंडे यांनी मानले.

COMMENTS