Homeताज्या बातम्या

केज तालुक्यात माणुसकी हरवली का? तीन मुले आणि एक मुलगी असूनही आषाढीत वृद्ध माऊलीला अन्नासाठी भटकंतीची वेळ

बीड: आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर राज्यभर भक्तीचा उत्साह आणि विठ्ठल नामाचा जयघोष सुरू असतानाच बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक हृदय

बीड शहराचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न पुन्हा सभागृहात; २० दिवसांआड येणारे पाणी २ दिवसांवर आणण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी महावितरणला वर्ग करण्याची आ. संदीप क्षीरसागर यांची मागणी
रस्त्यावरील कथित अतिक्रमण प्रकरण पुन्हा चर्चेत; जिल्हा परिषदेकडून चौकशीचे आदेश
झुरळाने हुकूमशहाला देखील हरवले…; उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत उत्साह

बीड: आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर राज्यभर भक्तीचा उत्साह आणि विठ्ठल नामाचा जयघोष सुरू असतानाच बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील एका गावातील वृद्ध माऊलीला भावकीच्या त्रासाला कंटाळून घर आणि गाव सोडावे लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे तीन मुले आणि एक मुलगी असतानाही या वृद्ध मातेला वृद्धापकाळात अन्न आणि निवार्‍यासाठी भटकंती करण्याची वेळ आली.

शनिवार, दि. २१ रोजी बीड शहरातील बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक वृद्ध महिला अत्यंत दयनीय अवस्थेत आढळून आली. अंगावर जुनी-मळलेली साडी, हातात कोणतीही वस्तू नाही, सोबत केवळ एक मळकट पांघरूण आणि चेहर्‍यावर असहाय्यतेचे भाव असलेल्या या माऊलीला पाहून नागरिकांनी तिची विचारपूस केली. त्यावेळी तिने सांगितलेली व्यथा ऐकून उपस्थित नागरिक अक्षरशः भावूक झाले.

या वृद्ध महिलेने सांगितल्यानुसार, भावकीतील लोकांकडून होणार्‍या त्रासामुळे तिला स्वतःचे घर सोडावे लागले. एवढेच नाही तर तिला गावातूनही बाहेर पडण्याची वेळ आली. कोणताही आधार नसल्याने आणि कुठे जावे हे समजत नसल्याने तिने केज येथून बीडकडे पायी जाण्याचा निर्णय घेतला. दोन दिवस उन्हाच्या झळा सहन करत, अनवाणी पायाने प्रवास करत ही वृद्ध माऊली बीड बसस्थानकात पोहोचली. मात्र पुढे कुठे जायचे, कोणाचा आधार घ्यायचा, याची चिंता तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती.

या माऊलीला तीन मुले आणि एक मुलगी आहे, मात्र परिस्थितीने तिला एकाकी केले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, एका मुलाने संसाराचा त्याग करून विरक्त जीवन स्वीकारले आहे; दुसर्‍या मुलाने त्रास असह्य झाल्याने गाव सोडले आहे; तिसर्‍या मुलाचा काहीच ठावठिकाणा नाही; तर मुलगी विवाहित असल्याने तिच्या घरी कायमचे राहणे योग्य वाटत नसल्याची भावना तिने व्यक्त केली. “मुलं असूनही आज माझ्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली,” अशी भावना व्यक्त करताना या वृद्ध माऊलीच्या डोळ्यात अश्रू तरळले.

वृद्धापकाळात आई-वडिलांची सेवा करणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा मानली जाते. मात्र या घटनेने त्या मूल्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आषाढीच्या काळात विठ्ठल भक्तीचा उत्सव साजरा होत असताना एका वृद्ध आईला आधारासाठी भटकावे लागणे ही समाजासाठी चिंतनाची बाब असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

पत्रकार व पोलिसांच्या तत्परतेने मिळाला निवारा

बसस्थानक परिसरात असहाय्य अवस्थेत असलेल्या या माऊलीची माहिती ज्येष्ठ पत्रकार अमजद खान यांच्या निदर्शनास आली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जाधवर यांच्याशी संपर्क साधून वृद्ध महिलेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या सहकार्याने या माऊलीला सुरक्षितपणे बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर बीड जिल्ह्यात नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. वृद्ध आई-वडिलांना आधार देण्याऐवजी त्यांना घराबाहेर काढण्याच्या घटना समाजासाठी गंभीर इशारा असल्याचे बोलले जात आहे. संबंधित घटनेची सखोल चौकशी करून वृद्ध महिलेला कायमस्वरूपी आधार मिळवून द्यावा, तसेच तिला त्रास देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS