Homeताज्या बातम्या

’विठू माऊली तू माऊली जगाची’च्या स्वरांनी नांदेड दुमदुमले; आषाढी महोत्सवात भक्तिरसाची अविस्मरणीय पर्वणी

नांदेड: आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात नांदेडकरांना अभंग, भजन आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय सांगीतिक सोहळा अनुभवायला मिळाला. जिल्हा काँग्रेस

नीट पेपरफुटीप्रकरणी राजधानीत आमरण उपोषण; सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात
नीट पेपरफुटी प्रकरणाचे देशभरात पडसाद! सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी
आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त सात कर्तृत्ववान महिलांचा महापालिकेकडून गौरव

नांदेड: आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात नांदेडकरांना अभंग, भजन आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय सांगीतिक सोहळा अनुभवायला मिळाला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या आषाढी महोत्सवात शनिवारी (दि. २५) शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह विठ्ठलनामाच्या गजराने अक्षरशः दुमदुमून गेले. सुप्रसिद्ध गायिका व ’सारेगमप’ महाविजेती कार्तिकी गायकवाड-पिसे आणि ’गौरव महाराष्ट्राचा’ महाविजेता कौस्तुभ गायकवाड यांच्या सुरेल अभंगांनी उपस्थित भाविकांना भक्तिरसात चिंब भिजविले.

’विठू माऊली तू माऊली जगाची…’, ’टाळी वाजवावी गुढी उभी राहिली…’, ’खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाळी रे…’ यांसारख्या लोकप्रिय अभंगांच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भक्तिमय वातावरणाने भारावून गेले. प्रत्येक अभंगानंतर टाळ्यांचा कडकडाट होत होता, तर अनेक भाविक अभंगांच्या तालावर हरिनामाचा गजर करत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

मान्यवरांची उपस्थिती आणि गौरव कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव रेहाना चिश्ती, माजी आमदार ईश्वरराव भोसिकर, ह.भ.प. भाऊसाहेब पावडे महाराज, ज्येष्ठ काँग्रेस नेते हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, प्रा. यशपाल भिंगे, सुरेश गायकवाड, सुरेंद्र घोडजकर, श्रावण रँपनवाड, स्मिता शहापूरकर, डॉ. दिनेश निखाते, अब्दुल हफीज, तिरुपती कोंढेकर, अब्दुल गफ्फार, एकनाथ मोरे, आनंद चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात आयोजक विठ्ठल पावडे यांनी वारकरी संप्रदायाने आपल्या जीवनावर केलेल्या संस्कारांची आठवण करून दिली. वारकरी संप्रदाय हा जात-धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक समतेचा संदेश देणारा असून समाजाला एकत्र आणण्याचे कार्य करतो, असे त्यांनी सांगितले. हा आषाढी महोत्सव कोणत्याही एका व्यक्तीचा नसून संपूर्ण समाजाचा असल्याचे नमूद करत उपस्थितांच्या प्रेमामुळेच हा उपक्रम सातत्याने राबविण्याची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय सचिव रेहाना चिश्ती यांनी मराठवाडा ही संतांची भूमी असून सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक असल्याचे सांगितले. नांदेडसारख्या पवित्र भूमीत अशा भक्तिमय कार्यक्रमात सहभागी होण्याचा आनंद वेगळाच असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्घाटक खा. रवींद्र चव्हाण यांनी विठ्ठल पावडे यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्याचे कौतुक करत, मानवता आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणारे असे उपक्रम समाजाला नवी दिशा देणारे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे निवेदन पूजा थिगळे यांनी, तर सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी प्रभावीपणे केले. शेवटी विठ्ठलनामाच्या गजरात आणि अभंगांच्या स्वरात आषाढी महोत्सवाची सांगता झाली. नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

COMMENTS