Homeताज्या बातम्या

श्रीगोंद्यातील प्रा. चेतन दिवाण यांची महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणावर सदस्य म्हणून नियुक्ती

श्रीगोंदा: श्रीगोंदा येथील सनराईज समाजकार्य महाविद्यालयाचे प्रभारी संचालक प्रा. चेतन दिवाण यांची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूरमध्ये रक्तदान शिबीर उत्साहात पारदर्शक
कर्जतच्या ३६० अंगणवाड्यांचा कारभार अवघ्या ३ पर्यवेक्षिकांकडे; १२ पैकी ९ पदे रिक्त असल्याने कामाचा प्रचंड ताण
संत ज्ञानेश्वर माऊली दादांचे नाव घेतल्याने पुण्यवंत होता येते; महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे प्रतिपादन

श्रीगोंदा: श्रीगोंदा येथील सनराईज समाजकार्य महाविद्यालयाचे प्रभारी संचालक प्रा. चेतन दिवाण यांची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रातील त्यांचा अभ्यास, संशोधन, मनोरुग्ण सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदान आणि दीर्घकालीन अनुभवाची दखल घेत शासनाने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.

मानसिक आरोग्य सेवा अधिनियम २०१७ अंतर्गत कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण हे राज्यातील मानसिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या प्राधिकरणामार्फत मानसिक आरोग्य संस्थांची नोंदणी व मानकीकरण, मानसिक आजारग्रस्त रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण, सेवा गुणवत्तेची तपासणी, मानसिक आरोग्य व्यावसायिकांचे प्रशिक्षण व क्षमता विकास, शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी, मानसिक आजारांबाबत समाजातील कलंक दूर करण्यासाठी जनजागृती तसेच समुदायाधारित मानसिक आरोग्य सेवा अधिक व्यापक करण्याचे काम केले जाते.

प्रा. चेतन दिवाण यांनी समाजकार्य क्षेत्रात कार्य करताना मानसिक आरोग्य विषयावर संशोधन, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, सामाजिक जनजागृती आणि मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा राज्यातील मानसिक आरोग्य व्यवस्थेला निश्चितच मोठा लाभ होईल, असा विश्वास आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, समाजकार्य अभ्यासक आणि विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, प्रा. चेतन दिवाण यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, नव्या जबाबदारीच्या यशस्वी कार्यकाळासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्रीगोंदा तालुक्यासाठी ही नियुक्ती अत्यंत अभिमानाची बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS