बीजिंग: दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांतात 'नौल' चक्रीवादळाने रविवारी सकाळी किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर चीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने सर्वोच

बीजिंग: दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांतात ‘नौल’ चक्रीवादळाने रविवारी सकाळी किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर चीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने सर्वोच्च स्तराचा ‘लाल इशारा’ (Red Alert) जारी केला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक भागांत मुसळधार पाऊस, वेगवान वारे आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
हवामान केंद्राच्या माहितीनुसार, किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर ‘नौल’ चक्रीवादळाची तीव्रता काहीशी कमी झाली असून त्याचे रूपांतर सामान्य चक्रीवादळात झाले आहे. मात्र, त्याचा प्रभाव अद्याप कायम असल्याने दक्षिण चीनमधील अनेक भागांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे. चीनमध्ये हवामानविषयक धोक्यांसाठी चार स्तरांची रंगाधारित इशारा व्यवस्था आहे. यामध्ये ‘लाल’ हा सर्वाधिक गंभीर इशारा मानला जातो, त्यापाठोपाठ नारंगी, पिवळा आणि निळा अशा क्रमाने इशारे दिले जातात.
राष्ट्रीय हवामान केंद्राने चक्रीवादळासोबतच मुसळधार पावसासाठीही लाल इशारा जारी केला आहे. तसेच तीव्र हवामानविषयक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पिवळा इशारा देत स्थानिक प्रशासनाला अचानक येणारा पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यापूर्वी शनिवारी चीनच्या राज्यस्तरीय पूर नियंत्रण आणि दुष्काळ निवारण यंत्रणेने ग्वांगडोंग प्रांतातील पूर व चक्रीवादळ नियंत्रणासाठी आपत्कालीन प्रतिसाद तिसऱ्या स्तरावर नेला होता. तसेच जियांग्शी आणि हुनान या प्रांतांमध्ये संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन चौथ्या स्तरावरील आपत्कालीन प्रतिसाद लागू करण्यात आला आहे.

COMMENTS