Homeताज्या बातम्या

’लातूर पॅटर्न’च्या नावाखाली गुणवंत विद्यार्थ्यांचे श्रेय विकत घेतले जाते?अ‍ॅड.अण्णाराव पाटील यांचे गंभीर आरोप

नांदेड : नीट(नीट-यूजी) पेपरफुटी प्रकरणात मुख्य संशयित म्हणून अटक झालेला आणि आरसीसी(आरसीसी)कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर सध्या सीबीआयच्

‘ज्ञानगंगा’च्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोपरगावचे चौघे ‘टॉप टेन’ मध्ये 
सय्यद समीया दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात गुणवंतांचा  गौरव


नांदेड : नीट(नीट-यूजी) पेपरफुटी प्रकरणात मुख्य संशयित म्हणून अटक झालेला आणि आरसीसी(आरसीसी)कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर सध्या सीबीआयच्या कोठडीत असतानाच, लातूरमधील काही कोचिंग क्लासेसच्या कार्यपद्धतीवर लातूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ ड. अण्णाराव पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत.
ग्रामीण भागातील तसेच इतर महाविद्यालयांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचे यश आर्थिक प्रलोभन देऊन स्वतःच्या संस्थेचे असल्याचे दाखविले जात असून, यामधून पालकांची दिशाभूल केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.अ‍ॅड.पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कोचिंग क्लासेसकडून राज्यभर मोठमोठे होर्डिंग्ज आणि जाहिराती लावून विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय घेतले जाते. मात्र, या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात त्या संस्थेत शिक्षण घेतलेले नसतानाही आर्थिक व्यवहार करून त्यांची संमती घेतली जाते आणि त्यानंतर ते विद्यार्थी संबंधित क्लासचे असल्याचा आभास निर्माण केला जातो, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन लाखो रुपयांपासून कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक प्रलोभन दिले जाते. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे फोटो आणि नावांचा वापर जाहिरातींमध्ये करून पालक व विद्यार्थ्यांमध्ये खोटी प्रतिमा निर्माण केली जाते. हा प्रकार शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत घातक असून याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. याचबरोबर ड. पाटील यांनी लातूरच्या ऐतिहासिक ’लातूर पॅटर्न’चा उल्लेख करत, त्यामागे राजर्षी शाहू महाविद्यालय आणि दयानंद महाविद्यालयातील प्राध्यापकांची अनेक वर्षांची मेहनत असल्याचे स्पष्ट केले. कै. डॉ. जनार्दन वाघमारे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर हा पॅटर्न उभा केला होता. त्याचा खासगी कोचिंग क्लासेसशी संबंध जोडून श्रेय घेण्याचा प्रयत्न म्हणजे लातूरच्या शैक्षणिक परंपरेचा अवमान असल्याची टीका त्यांनी केली. नीट पेपरफुटी प्रकरणावर बोलताना त्यांनी दुसर्‍यांदा घेण्यात आलेल्या परीक्षेच्या पारदर्शकतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पहिला पेपर फुटल्यानंतर दुसर्‍या परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, हे सर्व आरोप ड. अण्णाराव पाटील यांनी केले असून, संबंधित कोचिंग संस्था किंवा शिवराज मोटेगावकर यांची या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. या आरोपांची सत्यता संबंधित तपास यंत्रणा किंवा न्यायालयीन प्रक्रियेतून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे.

COMMENTS