Homeताज्या बातम्या

जीवघेणी निष्काळजी! सरस्वती कॉलनीत महावितरणचा उघडा ’फ्युज बॉक्स’ ठरतोय मृत्यूचा सापळा; निष्पापांच्या जिवाशी खेळण्याचा महावितरणचा नवा ’पराक्रम’

किनवट : महावितरणच्या ’स्मार्ट’ कारभाराचा आणखी एक अक्राळविक्राळ चेहरा समोर आला असून, शहरातील सरस्वती कॉलनीसह गोकुंदा भागात महावितरणने नागरिकांच्या

किनवट-माहूरच्या शेतकर्‍यांना न्याय द्या; प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे आ.केराम यांची जोरदार मागणी
धगधगत्या उन्हात वनराज तहानलेले; किनवटच्या जंगलातील पशु-पक्षी पाण्यासाठी ’वणवण’!
निर्भीड पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते बाळू भंडारे यांचे निधन; किनवटमध्ये शोककळा


किनवट : महावितरणच्या ’स्मार्ट’ कारभाराचा आणखी एक अक्राळविक्राळ चेहरा समोर आला असून, शहरातील सरस्वती कॉलनीसह गोकुंदा भागात महावितरणने नागरिकांच्या जीवाशी थेट जुगार मांडल्याचे पाहायला मिळत आहे. गल्लीबोळातील ’डीपी’ आणि फ्युज बॉक्सचे दरवाजे उघडे टाकून प्रशासनाने जणू निष्पाप नागरिकांना, लहान मुलांना आणि जनावरांना मृत्यूचेच उघडे आमंत्रण दिले आहे!
दररोज शेकडो नागरिक आणि लहान मुलांची वर्दळ असणार्‍या सरस्वती कॉलनीमध्ये महावितरणचा फ्युज बॉक्स उघड्या अवस्थेत धुरळा खात पडला आहे. उच्च दाबाच्या जीवघेण्या तारा आणि उघडे विजेचे सर्किट थेट रस्त्यावर कोणाच्याही सहजासहजी हाती लागतील अशा स्थितीत आहेत. खेळता खेळता लहान मुलांचा एखादा चुकून गेलेला हात किंवा रस्त्यावरून जाणार्‍या मुक्या जनावराचा स्पर्श… अन् क्षणार्धात खेळ खलास! एवढी भीषण शक्यता डोळ्यांसमोर दिसत असतानाही महावितरणचे बाबू मात्र गाढ झोपेत आहेत की कोणत्या मोठ्या अनर्थाची वाट पाहत आहेत, असा जळजळीत सवाल नागरिक विचारत आहेत. किनवट शहर आणि गोकुंदा परिसरातील हा ढिसाळपणा आता नवा उरलेला नाही. उघडे डीपी, लटकणार्‍या धोकादायक तारा आणि ऐनवेळी बंद पडणारी वीज हा येथील नागरिकांच्या पाचवीलाच पुजला गेला आहे. महावितरणच्या या बेजबाबदार आणि अक्षम्य निष्काळजीपणाने आता पराकोटीचा कळस गाठला आहे. रस्त्यावरचा उघडा फ्युज बॉक्स कोणाच्या जीवावर बेतणार? एखादी जीवितहानी झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी घेणार का? रिंगणात असणारे अधिकारी फक्त वीजबिल वसुलीसाठीच आक्रमक होतात का? नागरिकांच्या सुरक्षेशी चाललेला हा मांडव लवकरात लवकर गुंडाळा आणि ते उघडे पडलेले मृत्यूचे दरवाजे तत्काळ बंद करा! अन्यथा एखादी दुर्दैवी घटना घडल्यास संतप्त नागरिक महावितरणच्या अधिकार्‍यांना वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाहीत, असा थेट इशारा आता स्थानिक जनतेतून दिला जात आहे.

COMMENTS