Homeताज्या बातम्या

मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ; ६ ऑगस्टला आष्टीत भव्य आरोग्य मेळावा

कडा: मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मुख्

शाळेची इमारत मोडकळीस आल्याने वर्षभरापासून विद्यार्थी झाडाखाली; माजलगाव तालुक्यातील काळेगाव थडी येथील धक्कादायक प्रकार
आजारपणाला कंटाळून माय-लेकाची आत्महत्या; नागपूरच्या जलालपुरा परिसरातील दुर्दैवी घटना
‘क्लब निविदा’ प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; कंत्राटदार संघटनांची मागणी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

कडा: मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिरा’चा शुभारंभ मंगळवारी आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देणे हा आहे.

शुभारंभ कार्यक्रमात आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, विविध रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टर तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यकर्त्यांना शिबिराच्या नियोजनाची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच ६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

आष्टी येथील जामगाव रोडवरील अनिषा ग्लोबल स्कूल मैदानावर ६ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, कर्करोग, अस्थिरोग, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, किडनी विकार, मेंदूविकार, नेत्ररोग, नाक-कान-घसा, दंतरोग, श्वसनरोग, मानसिक आरोग्य, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि फिजिओथेरपी अशा विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

याशिवाय रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, लघवी तपासणी, सीबीसी, मलेरिया, टायफॉईड, एलएफटी, आरएफटी, सीआरपी, कॅल्शियम, कोलेस्टेरॉल यासह आवश्यकतेनुसार ५६ प्रकारच्या रक्त तपासण्या, मोफत औषध वितरण, चष्मे व काठ्यांचे वाटप तसेच गरजू रुग्णांना पुढील उपचार आणि मोफत शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार साळुंखे, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिवशंकर गलांडे, डॉ. संदीप गाडे, डॉ. दीपक, डॉ. हर्षल गरुड, डॉ. कागदे, उपविभागीय अधिकारी वसीमा शेख, तहसीलदार वैशाली पाटील, तहसीलदार निलावाड, कृषी उत्पन्न बाजार समिती कडा येथील सभापती रमजान तांबोळी, किरण शिंदे पाटील, शिरूर कासारचे नगराध्यक्ष रोहिदास पाटील गाडेकर, आष्टीच्या नगराध्यक्ष जिया बेग, राजेंद्र जाधव, सुरेश उगलमुगले, अनिल ढोबळे, भागवत येवले, तात्यासाहेब हूले, बद्रीनाथ जगताप यांच्यासह आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, सीएचओ, स्टाफ नर्स, आशा वर्कर्स, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाआरोग्य शिबिराची मुख्य वैशिष्ट्ये:

  • ६ ऑगस्ट २०२६ रोजी अनिषा ग्लोबल स्कूल मैदान, जामगाव रोड, आष्टी येथे आयोजन.
  • विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी.
  • आवश्यकतेनुसार ५६ प्रकारच्या रक्तचाचण्या पूर्णपणे मोफत.
  • मोफत औषध वितरण व गरजूंना चष्मे तसेच काठ्यांचे वाटप.
  • गंभीर रुग्णांना पुढील उपचार व मोफत शस्त्रक्रियेसाठी विशेष मार्गदर्शन.

COMMENTS