नांदेड: दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या नांदेड ब

नांदेड: दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या नांदेड बंदला गुरुवारी व्यापक प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख बाजारपेठानी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला, तर हजारो विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आयटीआय चौकातून सुरू झालेला हा मोर्चा शिवाजीनगर, कला मंदिर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसेसह विविध समविचारी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला. आंदोलकांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.
आंदोलकांचे म्हणणे आहे की, विद्यार्थी आपल्या शैक्षणिक प्रश्नांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून, त्याचाच भाग म्हणून नांदेडमध्ये बंद पाळण्यात आला. विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण व्हावे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन पूर्णपणे सतर्क होते. बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहिल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.
दरम्यान, पोलिसांच्या सूचनेनुसार नांदेड आगारातून सुटणारी एसटी बस सेवा सायंकाळपर्यंत स्थगित ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेकांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला, तर काहींना आपला नियोजित प्रवास पुढे ढकलावा लागला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतही या बंदला लक्षणीय प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले.

COMMENTS