इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा अत्यंत तीव्र झाला असून दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटले आहे. काही दिवसांपूर्वी शांत झालेला हा वाद आता अ

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा अत्यंत तीव्र झाला असून दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटले आहे. काही दिवसांपूर्वी शांत झालेला हा वाद आता अधिकच विकोपाला गेला असून अमेरिकेने सलग अकराव्या दिवशी इराणवर मोठे हल्ले चढवले आहेत. अमेरिकेच्या हवाई दलाने इराणच्या पाच महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य केले. आपल्या अणुसुविधांवर हल्ला न करण्याचा कडक इशारा इराणने देऊनही अमेरिकेने आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुजच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) व्यापारी जहाजांना धोका निर्माण करण्याची इराणची क्षमता नष्ट करण्याच्या उद्देशाने हे हल्ले करण्यात आले आहेत. दुसरीकडे, इराणनेही या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत होर्मुज खाडीच्या आसपासच्या भागांना आणि शहरांना टार्गेट केले आहे.
होर्मुज खाडी बंद; जगासह भारतावर परिणाम
अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने अत्यंत महत्त्वाचा असणारा होर्मुज खाडीचा सागरी मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. जोपर्यंत अमेरिका आपले हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत हा मार्ग बंदच राहील, असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनुसार, राजधानी तेहरानमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून ब्रिज, चाबहार, कोनारक आणि इराणचा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बुशेर शहरामध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.
हा मार्ग बंद झाल्याने संपूर्ण जगाला त्याचा मोठा फटका बसत आहे. भारतात आयात होणारा बहुतांश एलपीजी (LPG) गॅस आणि कच्चे तेल याच मार्गाने येते. त्यामुळे या बंदचा थेट परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
कच्च्या तेलाचे दर भडकले; पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या तणावामुळे आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे भारतात यापूर्वीच कच्च्या तेलाची मोठी टंचाई भासली होती, ज्यानंतर केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करावी लागली होती. आता पुन्हा अमेरिकेचे हल्ले सुरूच राहिल्यास भारतात इंधनाची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वेगाने वाढत असून बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारातच बेंचमार्क ब्रेंट क्रूडचे दर २.०१ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ९१.०१ डॉलरवर पोहोचले आहेत. इराणच्या या पावलावर आता अमेरिका काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS