Homeताज्या बातम्या

ऊसतोडणीसाठी पळवून आणलेल्या मजुराचा अपघाती मृत्यू; मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सोडून मुकादम पसार

केज: साखर कारखान्याची उचल घेऊनही ऊसतोडणीसाठी जाण्यास नकार देणाऱ्या मजुराला बळजबरीने पळवून नेल्यानंतर, या मजुराचा केज - कळंब महामार्गावर वाहनाच्या

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
वारकर्‍यांवर काळाचा घाला ; अपघातात 5 जणांचा मृत्यू
तिहेरी अपघातात पैठण येथील दोन युवक ठार
Beed accident: केज तालुक्यात ऊस तोडणीसाठी बळजबरीने पळवून नेलेल्या मजुराचा  अपघातात मृत्यू

केज: साखर कारखान्याची उचल घेऊनही ऊसतोडणीसाठी जाण्यास नकार देणाऱ्या मजुराला बळजबरीने पळवून नेल्यानंतर, या मजुराचा केज – कळंब महामार्गावर वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवनाथ नामदेव वायबसे असे मृत मजुराचे नाव आहे. अपघातानंतर गंभीर जखमी मजुराला रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळ काढणाऱ्या मुकादमांसह दोघांवर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.

माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी येथील नवनाथ वायबसे यांनी ऊसतोडीसाठी घेतलेली आठ हजार रुपयांची उचल परत करून कामावर जाण्यास नकार दिला होता. मात्र, सिद्धेश्वर महादेव चौरे आणि सारंग हनुमंत चौरे यांनी नवनाथ वायबसे यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून पळवून नेले. प्रवासादरम्यान त्याला दारू पाजण्यात आली. हे तिघे दुचाकीवरून धाराशिव जिल्ह्यातील कळंबकडे जात असताना केज-कळंब महामार्गावरील एका हॉटेलजवळ थांबले. तेथे रस्ता ओलांडत असताना नवनाथ वायबसे यांना पिकअप (MH 25 P 4564) आणि त्यानंतर एका प्रवासी टमटमने जोराची धडक दिली.

या भीषण अपघातात नवनाथ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात घडताच सोबत असलेल्या सिद्धेश्वर चौरे आणि सारंग चौरे यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवनाथ यांना रस्त्यावरच सोडून पळ काढला. त्यांनी कुटुंबालाही या घटनेची माहिती दिली नाही. नवनाथ यांना कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या आदेशानुसार दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेण्यात आली असून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. अंतिम संस्कार (राख सावडणे) पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी नातेवाईक गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद देणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

COMMENTS