शेवगाव: महावितरण कंपनीकडून शेवगाव शहर व तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविली जात असून, ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसविले जात असल्याच

शेवगाव: महावितरण कंपनीकडून शेवगाव शहर व तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविली जात असून, ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसविले जात असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ग्राहकांवर स्मार्ट मीटर लादू नयेत, वाढीव वीजबिले कमी करावीत आणि परवानगीशिवाय बसविलेले मीटर बदलून द्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.
प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महावितरणच्या कथित मनमानी कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे नसल्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध मीटर बसविले जात आहेत. तसेच स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांना तिप्पट वीजबिले येत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
आंदोलनादरम्यान उपकार्यकारी अभियंता सचिन बनसोडे व शहर अभियंता भाऊसाहेब पगारे यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. ज्या ग्राहकांना वाढीव वीजबिले आली असतील, त्यांच्या बिलांची तत्परतेने तपासणी करून योग्य ती दुरुस्ती केली जाईल, तसेच यापुढे ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणतेही स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाही, असे लेखी/तोंडी आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
मात्र, महावितरणच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर सोमवार (दि. २७ जुलै)पासून महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा प्रा. किसन चव्हाण यांनी दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, उपाध्यक्ष अरुण झांबरे पाटील, युवा तालुका अध्यक्ष ऑगस्टिन गजभीव, लक्ष्मण मोरे, शेख सलीम जिलाणी, रावसाहेब जाधव, लुकास गजभिव, दिलीप वाघमारे, शेख मुन्नाभाई, ईस्माईलखान, शिवाजी कातकडे आदींसह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

COMMENTS