बीड: बीड जिल्ह्यातील आष्टी येथील अनिषा ग्लोबल स्कूल मैदानावर ६ व ७ ऑगस्ट २०२६ रोजी 'मुख्यमंत्री महाआरोग्य शिबीराचे' आयोजन करण्यात आले आहे. या शिब

बीड: बीड जिल्ह्यातील आष्टी येथील अनिषा ग्लोबल स्कूल मैदानावर ६ व ७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘मुख्यमंत्री महाआरोग्य शिबीराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामुळे जिल्ह्यातील हजारो गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळण्यास मदत होणार असल्याने सर्व विभागांनी समन्वयाने काम करून वैद्यकीय मदत गरजूंपर्यंत पोहोचवावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. रुग्णांची यादी तयार करताना आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांची मदत प्राधान्याने घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे राज्य समन्वयक रितेश पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेख रौफ आणि डॉ. चैतन्य कागदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पदनिहाय समित्या स्थापन करून जबाबदाऱ्यांचे वाटप करण्याचे आणि दररोज माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले.
आमदार सुरेश धस हे या महाआरोग्य शिबीराचे संयोजक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमात धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संलग्न रुग्णालये, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अन्न व औषधी प्रशासनासह विविध सेवाभावी संस्थांचे सहकार्य लाभणार आहे.
तीन टप्प्यांत होणार शिबीराचे नियोजन
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे राज्य समन्वयक रितेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिबीराची रचना तीन टप्प्यांत करण्यात आली आहे:
१. पहिला टप्पा: पूर्वपरीक्षणामध्ये निदान झालेल्या रुग्णांची यादी तयार करणे.
२. दुसरा टप्पा: नवीन रुग्णांच्या प्राथमिक तपासण्या करून आजारांचे निदान करणे.
३. तिसरा टप्पा: ६ आणि ७ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष महाआरोग्य शिबीरात उपचार व सल्ला देणे.
शिबीराच्या मुख्य ठिकाणी नेत्रविकार, हृदय रोग, कर्करोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, दंतरोग, मेंदू विकार, किडनी रोग यांसह विविध २५ हून अधिक विशेष वैद्यकीय विभागांचे स्टॉल्स, चौकशी कक्ष आणि हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत.

COMMENTS