कर्जत: शहरातील नामांकित 'सुरेश काका सराफ अँड सन्स' या दुकानात भरदिवसा दोन अज्ञात महिलांनी चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली

कर्जत: शहरातील नामांकित ‘सुरेश काका सराफ अँड सन्स’ या दुकानात भरदिवसा दोन अज्ञात महिलांनी चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या संपूर्ण चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात ओम सचिन कुलथे यांनी २० जुलै २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी महिलांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी महिला एका लहान मुलाला कडेवर घेऊन दुकानात आल्या. त्यावेळी दुकानात ओम कुलथे यांच्या पत्नी वैदेही आणि कर्मचारी अजीम झारेकरी उपस्थित होते. त्या महिलांनी चांदीचे वाळे दाखवण्याची मागणी केली. याच वेळी शेजारी अन्य ग्राहक पैंजण पाहत असताना, कर्मचारी अजीम हे त्यांना पैंजण दाखवत होते. या संधीचा फायदा घेत एका महिलेने १० ते १२ पैंजण असलेला गठ्ठा चोरून मागे उभ्या असलेल्या दुसऱ्या महिलेकडे दिला आणि दोन्ही महिला तातडीने दुकानाबाहेर पसार झाल्या.
महिला दुकानातून निघून गेल्यानंतर वैदेही कुलथे यांच्या पैंजणांची संख्या कमी असल्याचे लक्षात आले. संशय आल्याने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, महिलांनी चलाखीने पैंजण लांबवल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित महिलांचा शोध सुरू आहे. भरदिवसा आणि गजबजलेल्या परिसरातील दुकानात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे कर्जत शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे.

COMMENTS