आष्टी: शहरातील प्रभाग क्रमांक १५ व १६ लगत असलेल्या शेतशिवारात मोकाट जनावरे आणि वराहांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. नुकत

आष्टी: शहरातील प्रभाग क्रमांक १५ व १६ लगत असलेल्या शेतशिवारात मोकाट जनावरे आणि वराहांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकर्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली असतानाच ही मोकाट जनावरे शेतात घुसून कोवळ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करत आहेत. दुसरीकडे वराहांकडून पिकांचे नुकसान तर होतच आहे, शिवाय शेतामध्ये मोठ्या प्रमाणात घाण करून शेतीची अवस्था बिकट केली जात आहे.
शेतकर्यांनी या गंभीर समस्येबाबत नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी व सूचना करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकर्यांचे म्हणणे आहे की, एकीकडे शेतीसाठी वाढता खर्च, अनिश्चित पाऊस आणि दुसरीकडे मोकाट जनावरांचा उपद्रव यामुळे शेती करणेच अवघड बनले आहे. दिवस-रात्र शेताची राखण करूनही जनावरे पिकांवर ताव मारत असल्याने प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
नगरपंचायतीने तातडीने मोकाट जनावरे व वराहांचा बंदोबस्त करावा; अन्यथा प्रभाग क्रमांक १५ व १६ मधील सर्व शेतकरी नगरपंचायतीच्या दारात धरणे आंदोलन छेडतील, असा इशारा शेतकरी किशोर धोंडे, लक्ष्मण रेडेकर, भाऊ माने, छोटू वाल्हेकर यांच्यासह अनेक शेतकर्यांनी दिला आहे. शेतकर्यांच्या या संतप्त भूमिकेमुळे नगरपंचायत प्रशासन या प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास येत्या काही दिवसांत शेतकर्यांचा रोष तीव्र आंदोलनाच्या स्वरूपात उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS