अंबाजोगाई: अंबाजोगाई येथे दि. १५ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य अश्व रिंगण सोहळा २०२६ निमित्त झालेल्या वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत स्

अंबाजोगाई: अंबाजोगाई येथे दि. १५ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य अश्व रिंगण सोहळा २०२६ निमित्त झालेल्या वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वारकरी परंपरा, संत संस्कृती आणि वारीचा उत्साह जिवंत करणाऱ्या या मनमोहक समूहनृत्यामुळे शाळेने विविध वयोगटांमध्ये घवघवीत यश संपादन केले.
स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक, इयत्ता आठवी ते दहावी गटातही प्रथम क्रमांक, तर इयत्ता तिसरी ते चौथी गटात तृतीय क्रमांक मिळवत शाळेने अंबाजोगाईत आपले वर्चस्व सिद्ध केले. या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वरूपाताई दिग्रसकर यांचे नियोजन, मार्गदर्शन आणि परिश्रम मोलाचे ठरले. तसेच नृत्य अधिक आकर्षक व प्रभावी करण्यासाठी आवश्यक साहित्याची निर्मिती करणाऱ्या कला शिक्षिका श्रीमती अंजलीताई हाके यांच्या कल्पकतेचे विशेष कौतुक करण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल नवक्षितिज बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव तथा स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर शाळेचे सर्वेसर्वा श्री. संतोष (दादा) कुलकर्णी यांनी मुख्याध्यापिका, कला शिक्षिका आणि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले. तसेच नवक्षितिज बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका श्रीमती स्वरूपाताई दिग्रसकर, पर्यवेक्षिका श्रीमती दिपालीताई जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्तीभाव आणि सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. शाळेच्या या यशामुळे पालक, शिक्षक आणि अंबाजोगाईकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

COMMENTS