अहिल्यानगर: श्रीक्षेत्र अरणगाव येथील सद्गुरू श्री बुगाजी बुवा महाराज यांच्या संजीवन समाधीस्थळी दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी व द्वादशी यात्र
अहिल्यानगर: श्रीक्षेत्र अरणगाव येथील सद्गुरू श्री बुगाजी बुवा महाराज यांच्या संजीवन समाधीस्थळी दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी व द्वादशी यात्रा उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा दि. १९ जुलै ते २६ जुलै २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सोहळ्याची सुरुवात आषाढ शुद्ध षष्ठी (दि. १९ जुलै) रोजी झाली असून सप्ताहाची सांगता आषाढ वद्य द्वितीया (दि. २६ जुलै) रोजी होईल. सप्ताहात दररोज पहाटे काकडा भजन, विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, महाआरती, रात्री कीर्तन तसेच गोपालकाला व जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सप्ताहात ह.भ.प. अमोल महाराज सातपुते, योगेश महाराज खेंडके, मधुकर महाराज भोगाडे, हौसराव मगर महाराज, भिवसेन हराळ महाराज, माउली महाराज मोरे, आणि राधाकृष्ण अकोलकर महाराज आदी नामवंत कीर्तनकारांची कीर्तने रंगणार आहेत.
याशिवाय दररोज महाप्रसाद, भजन, प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २५ जुलै रोजी पहाटे अश्वपूजन व पालखी सोहळा, तर रविवार, दि. २६ जुलै रोजी महापूजा, रथ मिरवणूक व यात्रा महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. तसेच बुधवारी गुरुपौर्णिमेनिमित्त दि. २९ जुलै रोजी अर्जुन दामू शिंदे यांच्या सौजन्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन पांडुरंग बुगाजी बुवा समाधी देवस्थान ट्रस्ट, श्रीक्षेत्र अरणगाव यांच्या वतीने करण्यात आले असून, सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS