मुंबई : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात असलेली व्यापक कारवाई महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसने हाती घेतली आहे. पा

मुंबई : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात असलेली व्यापक कारवाई महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसने हाती घेतली आहे. पाकिस्तानातील कुख्यात गुन्हेगारी जाळ्याशी संबंधित शहजाद भट्टी याच्याशी समाजमाध्यमांच्या माध्यमातून कथित संपर्कात असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींविरोधात राज्यभर एकाच वेळी शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 150 हून अधिक ठिकाणी तपास आणि झडतीची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर विदर्भातून 10 संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर यांसह राज्यातील विविध शहरांमध्ये ही समन्वित कारवाई करण्यात आली. तपास यंत्रणांनी संशयितांच्या हालचाली, समाजमाध्यमांवरील संपर्क आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे ही मोहीम आखल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, तपास यंत्रणांच्या नजरेत 150 हून अधिक संशयित व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, तपासाची गोपनीयता लक्षात घेता अधिकृतरीत्या कोणत्याही व्यक्तीविषयी किंवा कारवाईच्या तपशीलाबाबत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. संबंधित यंत्रणा पुरावे गोळा करण्याचे आणि डिजिटल माध्यमांतील व्यवहारांची पडताळणी करण्याचे काम करत आहेत. दिल्लीतील विशेष तपास पथकाने अलीकडेच शहजाद भट्टीशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या दोन गटांचा पर्दाफाश करत दिल्ली आणि पंजाबमधून सहा जणांना ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्रातील तपासालाही वेग आला आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संशयितांनी दिल्लीतील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांची पाहणी करून त्यांचे चित्रण केले आणि ते एका प्रतिबंधित संदेशवहन माध्यमाद्वारे परदेशात पाठविल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घडामोडीनंतर महाराष्ट्रातील संभाव्य संपर्कांची माहिती तपासण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाने राज्यव्यापी शोधमोहीम सुरू केली. तपास यंत्रणा समाजमाध्यमांवरील संवाद, आर्थिक व्यवहार, डिजिटल साधनांतील माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांच्या संपर्कांचे विश्लेषण करत आहेत. कोणत्याही व्यक्तीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेले नसून, तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शहजाद भट्टी कोण?
शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील लाहोर परिसराशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला समाजमाध्यमांवरील विविध माध्यमांतून तो चर्चेत आला होता. त्यानंतर त्याचे नाव आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्यांशी जोडले जाऊ लागले. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, तो परदेशातून विविध गुन्हेगारी टोळ्यांशी संपर्क ठेवून डिजिटल माध्यमांचा वापर करत असल्याचा संशय आहे. भारतीय तपास संस्थांच्या नोंदींमध्ये त्याचे नाव अनेक संवेदनशील प्रकरणांत समोर आले आहे. समाजमाध्यमांचा वापर करून तरुणांशी संपर्क प्रस्थापित करणे, त्यांना चुकीच्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करण्याचा त्याच्यावर प्रमुख आरोप आहेत.

COMMENTS