किनवट उपविभाग शंभर टक्के अवैध धंदेमुक्त करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असून, तालुक्यात कसल्याही प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय खपवून घेतले जाणार नाही

किनवट उपविभाग शंभर टक्के अवैध धंदेमुक्त करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असून, तालुक्यात कसल्याही प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत, असा कडक इशारा नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) चंद्रशेखर कदम यांनी दिला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी (दि. 9 जुलै) सकाळी 11:30 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आयोजित पहिल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाचा आगामी ’क्शन प्लॅन’ पत्रकारांसमोर मांडला. एसडीपीओ कदम म्हणाले की, किनवट तालुका आणि हा परिसर माझ्यासाठी नवीन असला तरी गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे. शहरासह संपूर्ण तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लवकरच एक विशेष मोहीम हाती घेतली जाईल. याचाच एक भाग म्हणून, आगामी काळात तालुक्यातील प्रत्येक गावातील पोलीस पाटील आणि शहरातील व्यापारी वर्गाची तातडीने बैठक बोलावली जाणार आहे. या बैठकीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील अवैध धंद्यांची खडान् खडा माहिती (डाटा) संकलित केली जाईल आणि त्यानुसार थेट धडक कारवाई केली जाईल.तालुक्यातील जागरूक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करत पोलीस प्रशासनाने 9975679733 हा विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. तुमच्या परिसरात मटका, जुगार, अवैध दारू विक्री, अंमली पदार्थ किंवा इतर कोणताही बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्यास नागरिक या नंबरवर थेट कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सप संदेश पाठवू शकतात. माहिती देणार्या नागरिकाचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक अत्यंत गोपनीय ठेवला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे. याशिवाय ईमेलवरही लेखी निवेदन किंवा फोटो पाठवता येतील. महाराष्ट्र पोलिसांच्या ’सजग नागरिक हीच प्रशासनाची खरी ताकद’ या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवून, वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली हा ’क्शन प्लॅन’ आखण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या खंबीर नेतृत्वाखाली किनवट उपविभागात आता खाकीचा धाक आणखी घट्ट होणार आहे. नवनियुक्त अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे किनवटमधील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी पोलीस कर्मचार्यासह विवीध दैनिक व साप्ताहीक वृत्तपत्राचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS