कोपरगाव शहर : कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेवटचे गाव असलेल्या ओगदी व करंजी या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून यावरून प्रवास करणारे करंज

कोपरगाव शहर : कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेवटचे गाव असलेल्या ओगदी व करंजी या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून यावरून प्रवास करणारे करंजी,ओगदी,आंचलगावचे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी या रस्त्याला नुकत्याच होत असलेल्या पावसामुळे तळ्याचे स्वरूप आले आहे; तर अनेक ठिकाणी चिडचिड झाल्याने दुचाकीस्वार घसरून पडले असल्याचे पहावयास मिळत आहे.यावर अधिक माहिती देताना करंजी गावचे उपसरपंच शिवाजी जाधव यांनी सांगितले की, करंजी ते ओगदी हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या रस्त्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात उद्घाटन झाले. नागरिकांनी समाधान व्यक्त करत अडचणीचा ठरत असलेल्या रस्ता लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार आशुतोष काळे यांचे यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आभार मानले. परंतु संबंधित ठेकेदारांने तात्पुरत्या स्वरूपात फक्त साईड पट्ट्या भरत यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना गाजर दाखवल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. त्यामुळे अनेक वेळा संबंधित ठेकेदाराकडे तसेच संबंधित विभागाकडे संपर्क साधत सदरच्या रस्त्याचे काम सुरू करण्याची विनंती केली . परंतु संबंधित ठेकेदाराने या मागणीला आपसूक दुर्लक्ष केले. त्यामुळे दोन वर्षे उद्घाटन होऊन देखील काम सुरू न करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर प्रशासन का मेहेरबान आहे असा सवाल नागरिक करतायेत. ठेकेदाराने सदर रस्त्याचे काम त्वरित सुरू नाही केले तर ओगदी करंजी गावच्या ग्रामस्थांना सोबत घेऊन शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा करंजी गावचे उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक शिवाजी जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.संबंधित ठेकेदाराकडे प्रशासन या नात्याने वेळोवेळी तोंडी अथवा लेखी पाठपुरावा करत सदर रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी केली, परंतु अद्यापही संबंधित ठेकेदाराने काम सुरू केले नाही. त्यामुळे तसा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे पाठवणार आहे.- अमित चोळके, कनिष्ठ अभियंता,प्रधानमंत्री ग्राम सडक योजना.

COMMENTS