पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले असून मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी पहाटे भीषण दुर्घटन
पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले असून मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. डोंगरकड्यावरून मोठी दरड कोसळून एका घरावर पडल्याने संपूर्ण घर माती व दगडांच्या ढिगार्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत तिघांचे मृतदेह हाती लागला असून उर्वरित कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. प्रशासनाकडून 23 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग खचून घरावर कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर महसूल विभाग, पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार, महसूल अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मुसळधार पाऊस, चिखल आणि दगडांचा मोठा ढिगारा यामुळे बचावकार्यात सुरुवातीला अडथळे निर्माण झाले. मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीने यंत्रणांनी ढिगारा हटविण्याचे काम वेगाने सुरू केले. दरड मोठ्या प्रमाणात कोसळल्याने स्थानिक साधनसामग्री अपुरी पडत होती. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पुणे येथील पाचव्या तुकडीला पाचारण करण्यात आले. निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तीस सदस्यांचे विशेष बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या पथकात एक वरिष्ठ अधिकारी, दोन अधिकारी आणि सत्तावीस प्रशिक्षित जवानांचा समावेश असून अत्याधुनिक बचाव साहित्य, शोध उपकरणे आणि आवश्यक यंत्रसामग्रीसह त्यांनी पहाटेपासून शोधमोहीम हाती घेतली आहे. ढिगार्याखाली आणखी नागरिक अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरीने बचावकार्य सुरू आहे.
प्रशासन सतर्क; परिसरात खबरदारीचे आवाहन
घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण परिसरात सतर्कता वाढविली आहे. डोंगराळ भागातील नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये तसेच दरडप्रवण भागांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

COMMENTS