मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरातील तीन मजली चाळी

मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरातील तीन मजली चाळीचा काही भाग अचानक कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच चिमुकल्यांसह एका महिलेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यातील धोकादायक बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रविवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास जनता नगर येथील हनुमान मंदिराजवळ असलेल्या चाळ क्रमांक पाचमधील तळमजला आणि त्यावरील मजल्यांचा काही भाग अचानक कोसळला. संबंधित चाळ धोकादायक असल्याचे यापूर्वीच घोषित करण्यात आले होते. त्यामुळे रहिवासी घर रिकामे करण्याबरोबरच घरातील सामान बाहेर काढण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी इमारतीचा भाग कोसळल्याने अनेकजण ढिगार्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस, महानगरपालिका प्रशासन तसेच रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकांनी युद्धपातळीवर ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. त्यानंतर जखमी आणि ढिगार्यातून बाहेर काढलेल्या नागरिकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात एका महिलेसह तीन मुली आणि एका मुलाला मृतावस्थेत आणण्यात आले. तर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात आणखी एका सात वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या रेहान अली (24) यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, कोसळलेली इमारत रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू असताना ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये आलिया (7), मुस्कान (14), निहाल (6), नाबिया (2), मुनाफ (7) आणि सोनी (32) यांचा समावेश असून हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दुर्घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री गिरीश महाजनांनी दिली घटनास्थळी भेट
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, या भागातील अनेक घरे अत्यंत लहान जागेवर परवानगीशिवाय अनेक मजले उभारून बांधण्यात आली आहेत. अरुंद रस्ते आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी आल्या. अशा धोकादायक बांधकामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शासनाच्या नियमानुसार मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील धोकादायक इमातींचा प्रश्न ऐरणीवर
या दुर्घटनेमुळे मुंबईतील जीर्ण, धोकादायक आणि परवानगीशिवाय उभारलेल्या बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा दुर्घटना घडत असतानाही प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. धोकादायक इमारतींची तातडीने तपासणी करून रहिवाशांचे सुरक्षित पुनर्वसन करावे, तसेच अशा बांधकामांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS