Homeताज्या बातम्या

परभणीत सभामंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू

परभणी : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवारी दुपारी अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. हनुमान मंदिरासमोरी

गणपतीपुळे समुद्रकिनार्‍यावर पाच जण बुडाले
वशाल अग्रवाल यांना तो व्हिडिओ भोवणार
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात


परभणी : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवारी दुपारी अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. हनुमान मंदिरासमोरील सभामंडपाचा काही भाग अचानक कोसळल्याने सात भाविकांचा मृत्यू झाला असून 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
शनिवार असल्याने मंदिरात दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सकाळपासूनच जिल्ह्यासह आसपासच्या भागांतून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात झाली होती. सभामंडपात धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाच अचानक बांधकामाचा भाग कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सभामंडपाचे छत आणि आधाररचना कोसळल्याने अनेक भाविक ढिगार्‍याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. सुमारे अडीच तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर ढिगार्‍याखाली अडकलेल्या सर्व 32 जणांना बाहेर काढण्यात यश आले. यापैकी सात जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले, तर 25 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी संजय चव्हाण, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यासह विविध विभागांच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्याचे समन्वयन केले. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने बचावकार्य पूर्ण करण्यात आले. या दुर्घटनेबद्दल खासदार संजय जाधव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून जखमी भाविकांना तातडीने आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS