शिमला : हिमाचल प्रदेशात मान्सून सक्रिय झाल्यानंतर विविध भागांत नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः किन्नौर जि

शिमला : हिमाचल प्रदेशात मान्सून सक्रिय झाल्यानंतर विविध भागांत नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः किन्नौर जिल्ह्यातील चोलिंग परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर अचानक आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यासोबत आलेल्या माती, दगड आणि चिखलामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 पूर्णपणे बंद झाला असून अनेक वाहने मार्गात अडकून पडली आहेत. राज्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे 49 रस्ते, 42 वीज ट्रान्सफॉर्मर आणि 27 पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत.
पुराचा वेग अत्यंत तीव्र असल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अनेक वाहनांभोवती चिखल आणि दगडांचे ढिगारे साचल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले. किन्नौरचे उपायुक्त डॉ. अमित कुमार शर्मा यांनी महामार्गावरील मलबा हटविण्यासाठी तसेच अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी जड यंत्रसामग्री कार्यरत करण्यात आल्याची माहिती दिली. विविध विभागांची पथके घटनास्थळी तैनात असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लाहौल-स्पीती जिल्ह्यातील जाहलमा नाल्यात आलेल्या पुरामुळे तेथील पूल पुन्हा एकदा बाधित झाला आहे. सीमावर्ती रस्ते बांधणी संस्थेने उभारलेली तात्पुरती पुलियाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने उदयपूर उपविभाग आणि पांगी खोर्याचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच काळात उदयपूर उपविभागातील शेनूर गावातील शांती देवी यांना छातीचा संसर्ग आणि श्वसनाचा त्रास वाढल्याने उपचारासाठी कुल्लू येथे हलविण्यात येत होते. मात्र, रुग्णवाहिका जाहलमा नाल्याजवळ पोहोचली असता नाला दुथडी भरून वाहत होता. अशा परिस्थितीत सीमावर्ती रस्ते बांधणी संस्थेचे कर्मचारी आणि पोलिस जवानांनी विशेष यंत्राच्या साहाय्याने रुग्णाला स्ट्रेचरसह सुरक्षितपणे नाल्याच्या दुसर्या बाजूला पोहोचवले. त्यानंतर त्यांना कुल्लू येथील प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, संबंधित संस्थेने नाल्यावर तात्पुरता पूल उभारून मर्यादित स्वरूपात वाहतूक पुन्हा सुरू केली आहे. यापूर्वी मे महिन्यात झालेल्या भूस्खलनामुळे जाहलमा पूल नुकसानग्रस्त झाला होता. सध्या नव्या पुलाचे बांधकाम सुरू असून महिनाअखेरपर्यंत ते पूर्ण होईल, अशी माहिती स्थानिक आमदार अनुराधा राणा यांनी दिली आहे. हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून डोंगराळ भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

COMMENTS