अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने गुजरात आणि मध्य प्रदेशातील विविध ठिकाणी कारवाई करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संश
अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने गुजरात आणि मध्य प्रदेशातील विविध ठिकाणी कारवाई करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात हे संशयित गुजरातमध्ये संघटनेचे सक्रिय जाळे उभारण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
पथकाच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तींच्या हालचाली, संपर्क आणि संभाव्य कारवायांचा मागोवा घेण्यात येत असून, राष्ट्रविरोधी कृत्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवर विविध कायदेशीर बाबींची छाननी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाला गंभीर स्वरूपाचे मानले असून, पुढील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये अहमद अब्दुल्ला गाजीवाला, इब्राहिम मोहम्मद हुसेन घाघा, मुदस्सिर अब्दुल्ला गाजीवाला, जकारिया दुर्रानी, मुफ्ती फौजान, मोहम्मद अमीन शेरा, मोहम्मद अब्दुल रहमान सौदा आणि बिलाल मोहम्मद यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. चौकशीदरम्यान या व्यक्तींचे देशातील आणि परदेशातील संपर्क, आर्थिक व्यवहार, तसेच संभाव्य सहकार्यांची माहिती गोळा केली जात आहे. सुरक्षा संस्थांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS