Homeताज्या बातम्या

एनडीसीसी निवडणुकीत अर्ज छाननीचा राजकीय स्फोट; 86 अर्ज बाद, चिखलीकर-नागेलीकर यांच्यासह दिग्गजांना मोठा धक्का

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एनडीसीसी) संचालक मंडळाच्या निवडणुकीने अर्ज छानणीच्या टप्प्यातच मोठे राजकीय वळण घेतले आहे. छाननी

ममता बॅनर्जींचा भवानीपुरमधून उमेदवारी अर्ज दाखल; भाजपचेे सुवेंदू अधिकारी यांच्याविरुद्ध थेट सामना
एकाच पक्षात आले तरी कदम कोहळीकर-आष्टीकर यांच्यातील राजकीय वैमनस्य कायम?जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारीवर कायदेशीर आक्षेप
बारामती, राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; काँगे्रसची बारामतीत माघार, मात्र कोणत्याच उमेदवारांना पाठिंबा नाही


नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एनडीसीसी) संचालक मंडळाच्या निवडणुकीने अर्ज छानणीच्या टप्प्यातच मोठे राजकीय वळण घेतले आहे. छाननीअंती तब्बल 86 उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, गोविंदराव नागेलीकर यांच्यासह काही प्रभावशाली इच्छुकांचे अर्ज बाद झाल्याने निवडणुकीची समीकरणे एका झटक्यात बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नव्या सहकार कायद्यातील तरतुदींवर आधारित हरकती आणि त्यानंतर झालेल्या सुनावणीने यंदाची निवडणूक केवळ सहकारापुरती मर्यादित न राहता राजकीय प्रतिष्ठेची लढाई ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एनडीसीसी बँकेच्या 23 संचालक पदांसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर उत्सुकता दिसून आली. विविध राजकीय पक्षांतील नेते, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी पदाधिकारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 30 जून ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपेपर्यंत एकूण 255 अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर 1 जुलै रोजी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत हरकतींवरील सुनावणी तसेच अर्जांची छाननी सुरू होती. अनेक अर्जांवर कायदेशीर आणि तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे हरकती घेण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रिया अत्यंत नाट्यमय ठरली. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहीर केलेल्या अंतिम छाननी अहवालानुसार 255 पैकी 169 अर्ज वैध ठरले, तर 86 अर्ज बाद करण्यात आले. नव्या सहकार कायद्यानुसार सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तींच्या पात्रतेवर आक्षेप घेण्यात आल्याने काही दिग्गज नेत्यांची उमेदवारी धोक्यात आली. याच मुद्द्यावर माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि गोविंदराव नागेलीकर यांच्यासह इतर काही इच्छुकांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती समोर आली आहे.
या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील राजकीय गटबाजीला नवे परिमाण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक गटांनी आपल्या निवडणूक रणनीतीचा फेरआढावा घेण्यास सुरुवात केली असून, पुढील राजकीय हालचालींना वेग येण्याचे संकेत आहेत. दरम्यान, गोविंदराव नागेलीकर यांनी छाननीचा निर्णय न्यायालयात आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले असून, न्यायालयातून न्याय मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात इतर संबंधित नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला असता त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. नांदेड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी एनडीसीसी बँकेची निवडणूक नेहमीच निर्णायक मानली जाते. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी आपल्या समर्थकांना रिंगणात उतरवून बँकेवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी केली आहे. अशा परिस्थितीत अर्ज छानणीनंतर निर्माण झालेल्या नव्या राजकीय वास्तवामुळे निवडणुकीचा रंग अधिक चुरशीचा होणार असल्याचे चित्र आहे. आता सर्वांचे लक्ष 16 जुलै रोजी होणार्‍या उमेदवारी अर्ज माघारीकडे लागले आहे. त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असून, त्यानंतर निवडणुकीचे खरे राजकीय चित्र स्पष्ट होईल. 28 जुलै रोजी मतदान होणार आहे. मात्र, अर्ज बाद झालेल्या उमेदवारांकडून न्यायालयीन लढाई सुरू झाल्यास ही निवडणूक आणखी गाजण्याची शक्यता असून, सहकार क्षेत्रातील सत्तासमीकरणांवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहेत.
छाननीतील आकडे बोलके
संचालक पदे : 23
एकूण उमेदवारी अर्ज : 255
वैध अर्ज : 169
बाद झालेले अर्ज : 86
अर्ज माघारीची अंतिम तारीख : 16 जुलै
मतदान : 28 जुलै

COMMENTS