नांदेड : दैनिक लोकमंथनमध्ये प्रकाशित झालेल्या खतामध्ये वाळूची भेसळ? या वृत्ताची कृषी विभागाने तातडीने गंभीर दखल घेत उमरी येथील संबंधित खत विक्रेत

नांदेड : दैनिक लोकमंथनमध्ये प्रकाशित झालेल्या खतामध्ये वाळूची भेसळ? या वृत्ताची कृषी विभागाने तातडीने गंभीर दखल घेत उमरी येथील संबंधित खत विक्रेत्याच्या दुकानाची प्रत्यक्ष तपासणी केली. प्राथमिक तपासणीत संबंधित खतामध्ये वाळू अथवा रेतीची भेसळ आढळून आली नसल्याचे स्पष्ट झाले असले, तरी शेतकर्यांच्या तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन अधिकृत नमुने प्रयोगशाळेत रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
दैनिक लोकमंथनमध्ये 29 जून 2026 रोजी प्रकाशित झालेल्या वृत्तानंतर तसेच शेतकर्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उमरीचे कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) आर. के. लखमोड आणि पंचायत समिती उमरीचे कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) ए. सी. जोंधळे यांनी उमरी येथील मातोश्री ग्रो एजन्सी या कृषी निविष्ठा विक्री केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. तपासणीदरम्यान क्लासवन ग्रो बायोटेक अँड फर्टीलायझर प्रा. लि., येळावी (ता. तासगाव, जि. सांगली) या कंपनीचे क्लास वन झिंकेटेड सिंगल सुपर फॉस्फेट (दाणेदार) खत तपासण्यात आले. अधिकार्यांनी खताची पोती उघडून दाण्यांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच दाणे फोडून तपासणी केली असता ते सहज बारीक पावडरमध्ये रूपांतरित होत असल्याचे दिसून आले. या तपासणीत वाळू, रेती किंवा अन्य बाह्य कण आढळून आले नसल्याने प्राथमिक स्तरावर भेसळीचे कोणतेही संकेत मिळाले नसल्याचे कृषी विभागाने नमूद केले. तथापि, शेतकर्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता संबंधित खताचे अधिकृत नमुने घेऊन ते फर्टिलायझर टेस्टिंग लॅबोरेटरी, छत्रपती संभाजीनगर येथे रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खताच्या गुणवत्तेबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यात येईल व आवश्यकतेनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, संबंधित खत उत्पादक कंपनीकडे कृषी आयुक्तालयाने दिलेला राज्यस्तरीय खत उत्पादन परवाना असल्याची माहितीही विभागाने दिली आहे. त्यामुळे केवळ प्राथमिक तपासणीच्या आधारे कोणताही अंतिम निष्कर्ष काढू नये, असेही अधिकार्यांनी स्पष्ट केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांना आवाहन करताना सांगितले की, कुठेही अनधिकृत खत विक्री, जादा दराने विक्री, विनापरवाना खत विक्री किंवा खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याचे आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा. अशा प्रत्येक तक्रारीची तत्परतेने चौकशी करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकर्यांच्या हिताशी संबंधित प्रश्न सातत्याने मांडणार्या लोकमंथनच्या वृत्तामुळे प्रशासनाने तातडीने तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची प्रक्रिया सुरू केल्याने या प्रकरणात माध्यमांच्या सजग भूमिकेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
————

COMMENTS