बीड जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्यासाठी खा.बजरंग सोनवणे कायम प्रयत्

बीड जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्यासाठी खा.बजरंग सोनवणे कायम प्रयत्नशील आहेत. आज दि.30 जून 2026 रोजी खा.सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बीडमध्ये विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये रेल्वे मार्ग, खासदार निधी, जिल्ह्यातील वीज पुरवठा आणि पवनचक्की कंपन्यांच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा होणार असून, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना उपस्थित राहण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली महत्त्वपूर्ण बैठक सकाळी 11 वाजता रेल्वे मार्गाबाबत आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रलंबित धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर तसेच अहिल्यानगर-बीड-परळी या प्रस्तावित रेल्वे मार्गांबाबत प्रशासकीय बाबी आणि पुढील कायदेशीर व तांत्रिक कार्यवाहीवर चर्चा होणार आहे. या बैठकीला मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता (बांधकाम) यांच्यासह जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यानंतर, दुपारी 1 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, बीड येथे 16 वी लोकसभा (2014-19) व 17 वी लोकसभा (2019-24) या कालावधीत खासदार निधीतून मंजूर झालेल्या व झालेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. अनेक कामे प्रलंबित असल्याच्या तक्रारींनंतर खासदारांनी स्वत: या कामांचा लेखाजोखा मागवला आहे. शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने दुपारी 3 वाजता जिल्ह्यातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींची आणि संबंधित प्रशासकीय अधिकार्यांची बैठक महत्त्वाची ठरणार आहे. यामध्ये स्थानिक रोजगार, कंपन्यांचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर), महसूल, पायाभूत सुविधा आणि स्थानिक नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणर आहे. अनेक कंपन्या स्थानिक तरुणांना रोजगार देत नसल्याच्या व सीएसआर निधीचा वापर योग्य ठिकाणी होत नसल्याच्या तक्रारींवरून ही बैठक बोलवण्यात आली आहे. तर दुपारी 4 वाजता वीज पुरवठा सुरळीत व सुधारित करण्याबाबत बैठक होणार आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि औद्योगिक क्षेत्राला वारंवार होणारा वीज खंडित होण्याचा त्रास, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा (लो-व्होल्टेज), प्रलंबित विद्युत कामे, नवीन उपकेंद्रे व रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) यांची उपलब्धता आणि कृषी पंपांची वीज जोडणी यावर महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत खासदार सोनवणे थेट चर्चा करणार आहेत. खासदारांच्या या मॅरेथॉन बैठकांमुळे जिल्ह्यातील रखडलेल्या विकासकामांना मोठी गती मिळण्याची अपेक्षा बीडकरांकडून व्यक्त केली जात आहे.

COMMENTS