लखनौ : यमुना द्रुतगती मार्गावर मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत. मथुरा जिल्ह

लखनौ : यमुना द्रुतगती मार्गावर मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत. मथुरा जिल्ह्यातील राया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोला बस सेवेची आलिशान प्रवासी बस पहाटे सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास समोर असलेल्या ट्रेलरवर जोरात आदळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे पासष्ट प्रवासी प्रवास करत होते. धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण विभागाचे अपर पोलीस अधीक्षक, महावनचे उपविभागीय पोलीस अधिकारी, राया पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन विभागाच्या पथकांनी संयुक्तरीत्या बचावकार्य सुरू केले. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने मथुरा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
मृतांची ओळख पटविण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असून घटनास्थळी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर द्रुतगती मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः पहाटेच्या वेळेत होणारे अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
.

COMMENTS