संगमनेर: तालुक्यातील पश्चिम भागाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असणारा संगमनेर-ढोलेवाडी-राजापूर-जवळे कडलग-गणोरे या रस्त्यावरील काँक्रिटीकरण अत्यंत च

संगमनेर: तालुक्यातील पश्चिम भागाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असणारा संगमनेर-ढोलेवाडी-राजापूर-जवळे कडलग-गणोरे या रस्त्यावरील काँक्रिटीकरण अत्यंत चांगले झाले आहे. याच धर्तीवर नाशिक-पुणे महामार्ग (बोगदा) ते राजापूर रस्त्याचे तातडीने काँक्रिटीकरण करावे, अशी आग्रही मागणी राजापूरसह परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून संगमनेर ढोलेवाडी हायवेपर्यंतच्या रस्त्याचे अत्यंत दर्जेदार काँक्रिटीकरण झाले आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला व परिसरातील नागरिकांची वाहतुकीची मोठी सोय झाली आहे. तसेच परिसरातील वृद्ध नागरिक व रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
याच धर्तीवर नाशिक-पुणे हायवे (बोगदा) ते राजापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. हा रस्ता पश्चिम भागासह अकोले तालुक्याला जोडणारा असून, या परिसरातील गावांना दळणवळणाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हा रस्ता विनाविलंब मंजूर व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
हा रस्ता पूर्ण झाल्यास राजापूर, गुंजाळवाडी, चिकणी, निमगाव भोजापूर, जवळे कडलग यासह पश्चिम भागातील शालेय विद्यार्थी, शेतकरी, वृद्ध नागरिक आणि महिलांची मोठी सोय होणार आहे. या भागात भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून, त्यांचा माल वेळेत बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. गंभीर रुग्णांना तातडीने शहरात उपचारासाठी नेण्यासाठी रस्त्याचे काँक्रिटीकरण शासनाने तातडीने करावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS