शिर्डी: खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेत उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठा

शिर्डी: खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेत उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील सुमारे शंभर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची घोषणा जिल्हा समन्वयक मुकुंद सिनगर यांनी केली आहे. शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही अधिकृत भूमिका स्पष्ट केली.
पत्रकार परिषदेत बोलताना मुकुंद सिनगर म्हणाले की, पक्षातील नव्या जिल्हाप्रमुखांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रारी झाल्यानंतर आमच्याकडेच संशयाच्या नजरेने पाहिले जाऊ लागले. पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने अखेर आम्हाला सामूहिक राजीनाम्याचा हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. पक्षप्रमुखांबद्दल आदर कायम असला, तरी सध्याच्या स्थानिक परिस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सिनगर यांनी जाहीर केले.
राजकारणात वैचारिक भूमिका आणि समाजहिताला प्राधान्य मिळणे आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. समाजात मतभेद वाढविण्याऐवजी विकासाभिमुख राजकारणाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच विविध शासकीय समित्यांमध्ये शिवसैनिकांना काम करण्याची संधी मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करण्यावर आमचा भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी पक्षातील माजी सहकाऱ्यांनाही उद्देशून आपली भूमिका मांडली. अंतर्गत संघर्ष टाळून जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, आमच्यासोबत विनाकारण संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही सिनगर यांनी यावेळी दिला.

COMMENTS