Homeताज्या बातम्या

देवळाली प्रवरात भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत २६ वर्षीय तरुण ठार

देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बागायत पीक सोसायटी परिसरात अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २६ वर्षी

‘वृद्धेश्वर’वर आ. राजळेंची तर ‘मुळा’वर गडाखांची एकहाती सत्ता; साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे निर्विवाद वर्चस्व
हदगाव येथे भाजपची बूथस्तरीय कार्यकर्त्यांची बैठक २७ जून रोजी; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरणार
तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईची धास्ती; नांदेडच्या बाजारातून सुटे खाद्यतेल गायब, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांचा हिशोब कोण घेणार?

देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बागायत पीक सोसायटी परिसरात अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २६ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता. दुर्दैवाने, उपचार सुरू असताना या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मृत तरुणाचे नाव गणेश राजेंद्र जाधव (वय २६, रा. गुहा, ता. राहुरी) असे आहे. २४ जून रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास गणेश जाधव हे आपल्या दुचाकीवरून गुहा गावाकडे जात होते. दरम्यान, देवळाली प्रवरा येथील बागायत पीक सोसायटी परिसरात एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गणेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी गणेश जाधव यांना तातडीने राहुरी फॅक्टरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. गणेश जाधव यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS