राहाता: लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवत तालुक्यातील एका हॉटेल व्यावसायिकाची तब्बल अडीच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर
राहाता: लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवत तालुक्यातील एका हॉटेल व्यावसायिकाची तब्बल अडीच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाह उरकल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच नवरी पसार झाल्याने हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात संघटित टोळीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, राहाता तालुक्यातील हसनापूर येथील एक हॉटेल व्यावसायिक विवाहासाठी वधूच्या शोधात होता. त्याच्या एका नातेवाइकाला रिक्षा प्रवासादरम्यान लताबाई पवार नावाच्या महिलेचा परिचय झाला होता. नातेवाइकाने विवाहाबाबत विचारणा केली असता, पवार यांनी आपल्या ओळखीच्या व्यक्तींमार्फत नाशिक येथे मुलगी उपलब्ध असल्याचे सांगितले; तसेच लग्नासाठी अडीच लाख रुपये खर्च येईल अशी माहिती दिली.
त्यानुसार ६ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधित तरुण व त्याचे नातेवाईक नाशिकला गेले. तेथे एका विवाह संस्थेमार्फत त्यांचा विवाह लावून देण्यात आला. या विवाह सोहळ्याच्या व इतर कारणांसाठी टप्प्याटप्प्याने अडीच लाख रुपयांची रक्कम आरोपींनी स्वीकारली. विवाह आटोपून आल्यानंतर १० ऑक्टोबर रोजी नवरीने आपल्या मामाकडे जाण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दोघेही बसने नाशिकहून निघाले. मात्र, सिन्नर बसस्थानकावर आल्यानंतर एका रिक्षाचालकाला “हा मामाचा मित्र आहे” असे सांगून नवरी त्या रिक्षात बसली आणि तेथून पसार झाली. पीडित तरुणाने तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती हाती लागली नाही. यानंतर संशयित नातेवाइकांशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत दमदाटी सुरू केली.
काही दिवसांनी वर्तमानपत्रात लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या एका टोळीवर कारवाई झाल्याची बातमी पीडिताने वाचली. ती पद्धत पाहून आपलीही त्याच टोळीने फसवणूक केल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणात मंगल अंकुश पठारे (रा. साकुरी, ता. राहाता), भिवा भिमा माळी (रा. पुणतांबा), खंडू, राणी सुखदेव पवार, संगीता खंडू दाते, लताबाई विश्वनाथ पवार (रा. लोणी) व सोनाली अशा संशयितांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मंगल पठारे हिला यापूर्वीच न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS