कोलकाता: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. यासोबतच बेका

कोलकाता: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. यासोबतच बेकायदेशीर घुसखोरी, सक्तीचे धर्मांतर आणि सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या कथित प्रकारांवर कठोर कायदे आणण्याची घोषणा त्यांनी केली. राज्याच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कोलकाता येथील रवींद्र सदनमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सीमा सुरक्षा, नागरिकत्व, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
घुसखोरांवर कडक कारवाई, निर्वासितांना नागरिकत्व
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, बेकायदेशीर मार्गाने भारतात आलेल्या आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्याची कारवाई केली जाईल. यासाठी सीमावर्ती भागांत तात्पुरती अटक केंद्रे (Detention Centers) उभारण्यात आली आहेत. दुसरीकडे, धार्मिक छळामुळे भारतात आश्रयासाठी आलेले हिंदू निर्वासित हे घुसखोर नसून, त्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA) नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा केला जाईल, अशी महत्त्वाची भूमिका त्यांनी मांडली.
देशहित आणि इतर महत्त्वाचे निर्णय
भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या किंवा दहशतवादी घटनांबाबत असंवेदनशील भूमिका घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेला सर्वोच्च प्राधान्य दिले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या “एक देश, एक विधान, एक प्रधान, एक निशाण” या विचारांशी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
याशिवाय, आणीबाणीला विरोध करणाऱ्या व्यक्तींचा आगामी ९ ऑगस्ट रोजी विशेष सन्मान करण्यात येणार असून, त्यासाठी ‘लोकशाही सेनानी समन्वय समिती’ स्थापन केली जाईल. पात्र व्यक्तींना अधिकृत प्रमाणपत्रे देण्याची योजनाही राबवण्यात येणार आहे. सामाजिक व घटनात्मक विषयांवर चर्चासत्रे आणि आपत्ती व्यवस्थापनासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल. तसेच, भवानीपूर येथील नव्या पक्ष कार्यालयातून दर महिन्याला दोन दिवस स्वतः मुख्यमंत्री नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकणार आहेत.

COMMENTS