Homeताज्या बातम्या

काळे गटाचे बिंग फुटले, आंदोलनाच्या नौटंकीचा डाव उधळला : उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचा घणाघात

कोपरगाव: घरपट्टी वाढीबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून अपूर्ण माहितीच्या आधारे नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा थेट आरोप

जग हादरले! व्हेनेझुएलामध्ये ७.५ तीव्रतेचा प्रलयंकारी भूकंप, जपानलाही ६.९ तीव्रतेचे धक्के; १० हजारांहून अधिक मृत्यूची भीती
आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त सात कर्तृत्ववान महिलांचा महापालिकेकडून गौरव
अ‍ॅड. साळुंके यांनी वकिलीला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवोद्गार,

कोपरगाव: घरपट्टी वाढीबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून अपूर्ण माहितीच्या आधारे नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा थेट आरोप उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी केला आहे. संबंधित करवाढीचा ठराव २०२१ मध्येच मंजूर झाला असून, त्याची अंमलबजावणी २०२४-२५ मध्ये अपेक्षित होती. मात्र, नागरिकांवर तातडीचा भार पडू नये यासाठीच हरकती नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रणशूर म्हणाले, की घरपट्टी वाढीची प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार आणि जिल्हाधिकारी स्तरावर राबविली जात आहे. ही करवाढ तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याबरोबरच विविध विकास योजनांसाठी मिळणाऱ्या निधीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या हरकती विचारात घेऊन ज्या ठिकाणी अधिकची वाढ झालेली आहे, तेथे योग्य तो सुवर्णमध्य काढण्यात येईल.

या प्रक्रियेशी संबंधित सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेच्या नियुक्तीवेळी विरोधी गटातील पदाधिकाऱ्यांचीच मुख्य भूमिका होती, असा दावाही त्यांनी केला. तसेच सन २०२० मध्ये झालेल्या काही ठरावांमुळेच आजची सद्यस्थिती उद्भवली असल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे सांगत रणशूर यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन केले. या हरकतींची रीतसर छाननी करून आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी प्रशासनाकडे गतीने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, घरपट्टी वाढीविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनावरही रणशूर यांनी कडाडून टीका केली. या संवेदनशील विषयाची संपूर्ण माहिती न घेता केवळ राजकीय हेतूने आंदोलन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांना खरोखर दिलासा मिळावा यासाठी स्टंटबाजी न करता वस्तुनिष्ठ पद्धतीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले.

COMMENTS