Homeताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या भेसळविरोधी मोहिमेस ग्राहक पंचायतीचा पाठिंबा  

अकोले : राज्यातील भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या धडक कारवाईला ग्राहक प

संतोष पेढेकर यांची भारतीय सैन्यात निवड
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द कराअकोलेत किसान सभेची निदर्शने
झुंबरबाई घोलप यांचे निधन


अकोले : राज्यातील भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या धडक कारवाईला ग्राहक पंचायत महाराष्ट्रने पाठिंबा दर्शविला आहे. या मोहिमेत सातत्य राखून आयुक्त तुकाराम मुंढे यांना पूर्ण कार्यकाळ देण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन अकोलेचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थकुमार मोरे यांच्यामार्फत शासनाला देण्यात आले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलीक, कार्याध्यक्ष महेश नवले, तालुकाध्यक्ष दत्ता शेनकर आणि सचिव राम रुद्रे यांनी ही माहिती दिली.
निवेदनात म्हटले आहे की, बाजारात हंगामानुसार विक्री होणारी फळे, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, बेकरी पदार्थ, खाद्यतेल, तूप, मसाले, डाळी, तांदूळ तसेच शीतपेये आदी खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी बनावट औषधे तसेच गुटखा, मावा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचीही विक्री सुरू असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना अशा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा मोठा फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, कावीळ, टायफॉईड, कर्करोगासह विविध गंभीर आजारांमध्ये वाढ होत असून काहींना जीवही गमवावा लागल्याचा दावाही करण्यात आला आहे.
भेसळीविरोधातील कारवाई सातत्याने सुरू राहणे आवश्यक असून अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे अन्न व औषध क्षेत्रात पारदर्शकता आणि कायद्याचा धाक निर्माण होत असल्याचे ग्राहक पंचायतीने म्हटले आहे.
मुंढे यांना त्यांच्या कार्याचा पूर्ण कालावधी मिळावा आणि वारंवार बदली करू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे पदाधिकारी व विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून त्याच्या प्रती मुख्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

COMMENTS