देवळाली प्रवरा : राज्य शासनाने शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप करण्याचे आदेश दिले असले, तरी राहुरी तालु

देवळाली प्रवरा : राज्य शासनाने शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप करण्याचे आदेश दिले असले, तरी राहुरी तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचे वास्तव समोर येत आहे. अनेक शाळांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात केवळ काही विद्यार्थ्यांना गणवेश देऊन छायाचित्रे काढण्यात आली आणि गणवेश वाटप पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगली आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश वाटपाबाबत वरिष्ठ स्तरावरून कारवाईचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली होती. मात्र शिक्षकांच्या विविध संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदने सादर करून नव्या गणवेश धोरणातील अडचणी मांडल्याने कारवाईचा बडगा काहीसा शिथिल झाल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अनेक शाळांमध्ये पहिल्या दिवशी केवळ पाच ते सहा विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आला. त्या विद्यार्थ्यांसोबत छायाचित्रे काढून गणवेश वाटप झाल्याचे अहवाल वरिष्ठ कार्यालयांकडे पाठविण्यात आले. काही ठिकाणी ही छायाचित्रे मुंबई मंत्रालय स्तरापर्यंत पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वाटप आणि कागदोपत्री नोंदी यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप होत आहे.
पाच दिवसांनंतरही वाटप सुरूच
शाळा सुरू होऊन पाच दिवस उलटल्यानंतरही अनेक शाळांमध्ये गणवेश वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालाच नसल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे. शासनाने दिलेल्या वेळेत कापड खरेदी, शिलाई आणि वितरण करणे अशक्यप्राय असल्याने अनेक शाळा अडचणीत सापडल्या होत्या.
पाठ्यपुस्तकांचाही प्रश्न कायम
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याची मोहीम मात्र बहुतांश शाळांनी पूर्ण केली. तथापि, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे पुस्तक वगळता इतर सर्व पुस्तके मिळाल्याचे समोर आले आहे. काही शाळांमध्ये अद्याप संपूर्ण संच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अपूर्ण पुस्तके देण्यात आल्याची माहिती आहे.
कारवाई होणार ?
“विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसेल तर कागदोपत्री वाटप दाखविणाऱ्यांवर कारवाई होणार का?”हा प्रश्न सध्या राहुरी तालुक्यातील अनेक पालक विचारत असून, शिक्षण विभागाने याबाबत वस्तुनिष्ठ चौकशी करून वास्तव जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे.

COMMENTS