देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील रेल्वे उड्डाण पुलाखाली एका ३५ वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उभे राहून आत्महत्या केल्याची दुर्द

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील रेल्वे उड्डाण पुलाखाली एका ३५ वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उभे राहून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १७ जून रोजी रात्री घडली. या घटनेमुळे सोनई येथील यशवंत नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनई गावातील यशवंत नगर येथील रहिवासी अविनाश हुरे (वय ३५) हे घोडेगाव येथील एका कापड दुकानात मजुरीचे काम करत होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. मात्र, पत्नी वेगळी राहत असल्याने ते आई आणि भावासोबत सोनई येथे वास्तव्यास होते.
नेहमीप्रमाणे १७ जून रोजी सकाळी ते घरातून कामावर जाण्यासाठी बाहेर पडले. मात्र, कामाच्या ठिकाणी न जाता ते पिंपरी अवघड येथील रेल्वे उड्डाण पुलाखाली दुचाकीसह पोहोचले. रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास त्यांनी रेल्वेसमोर उभे राहून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
आत्महत्येपूर्वी अविनाश हुरे यांनी एक चिठ्ठी लिहून खिशात ठेवली होती. त्यामध्ये त्यांचे नाव नमूद करून, “ही चिठ्ठी माझ्या आईकडे द्यावी. माझ्या आयुष्यात दुसरे कोणी नाही. माझा मोबाईल आणि दुचाकी घरी पोहोच करावी,” असा उल्लेख करण्यात आला होता.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने नातेवाईक तसेच राहुरी पोलिसांना कळविले. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे व पोलीस कर्मचारी भाऊसाहेब थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाज्ञा रुग्णवाहिकेचे चालक बाळासाहेब वराळे यांच्या मदतीने मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अविनाश हुरे यांच्या पश्चात आई व एक भाऊ असा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

COMMENTS