नायगाव : चालू खरीप हंगामात हवामानातील अनिश्चितता आणि ’अल निनो’च्या प्रभावामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीबाबत घाईगडबड करू नये, असे आवाहन तालुका कृ

नायगाव : चालू खरीप हंगामात हवामानातील अनिश्चितता आणि ’अल निनो’च्या प्रभावामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीबाबत घाईगडबड करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिपेश देवरे यांनी केले आहे. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास बियाण्यांची उगवण कमी होऊन दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते, त्यामुळे पुरेशा पावसाची प्रतीक्षा करूनच पेरणी करावी, असे त्यांनी सांगितले.
देवरे यांनी सांगितले की, परिसरात किमान ७५ ते १०० मिमी समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. यामुळे बियाण्यांची उगवण चांगली होऊन पीक जोमदार वाढते. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी घरचे किंवा बाजारातून घेतलेले बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता तपासावी. तसेच बियाण्यांवर बुरशीनाशक, कीटकनाशक तसेच रायझोबियम आणि पीएसबी यांसारख्या जैविक खतांची बीजप्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोयाबीनची लागवड रुंद सरी-वरंबा (बीबीएफ) पद्धतीने करण्याचा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे. या पद्धतीमुळे पाण्याचा योग्य निचरा होतो, जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होण्यास मदत मिळते. जोखीम कमी करण्यासाठी सोयाबीनसोबत तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. तसेच पेरणी करताना जमिनीच्या उताराला आडव्या दिशेने पेरणी केल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरून मृदधूप टाळता येते, असेही देवरे यांनी स्पष्ट केले.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी एमएयूएस-६१२, एमएयूएस-१५८, एमएयूएस-७१, एमएयू-७२५, केडीएस-९९२ तसेच तुरीसाठी बीडीएन-७११ व बीडीएन-७१६ या सुधारित वाणांची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पेरणीपूर्वी माती परीक्षण करून माती अहवालानुसार संतुलित खतांचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होतो आणि जमिनीचा पोतही चांगला राहतो. शेतकरी बांधवांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन पुरेशी ओल झाल्यानंतरच बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्यांची पेरणी करावी व दुबार पेरणीची वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिपेश देवरे यांनी केले आहे.

COMMENTS