माहूर : माहूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना मागील सहा महिन्यांपासून कमिशनची रक्कम मिळालेली नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. ज

माहूर : माहूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना मागील सहा महिन्यांपासून कमिशनची रक्कम मिळालेली नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. जानेवारी २०२६ पासून कमिशन थकल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून थकीत कमिशनची देयके तात्काळ अदा करावीत, अशी मागणी माहूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केली आहे.
या संदर्भात तहसीलदार अभिजित जगताप यांच्यामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने थकीत कमिशनची रक्कम तातडीने अदा न केल्यास १ जुलै २०२६ पासून कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. माहूर तालुका हा आदिवासी, बंजारा व डोंगराळ भागांनी व्यापलेला असून वाडी, तांडे आणि पाड्यांवरील गोरगरीब नागरिकांना नियमित धान्यपुरवठा करण्याची जबाबदारी स्वस्त धान्य दुकानदारांवर आहे. कोरोनासारख्या संकटकाळातही जीवाची पर्वा न करता दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांना वेळेवर अन्नधान्य उपलब्ध करून दिले. मात्र आज त्यांनाच आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत असल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.
संघटनांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून मिळणार्या तुटपुंज्या कमिशनवरच अनेक दुकानदारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण, वीजबिल आणि इतर अत्यावश्यक गरजा भागविणे कठीण झाले आहे. त्यातच वाढती महागाई, शेतीसाठी लागणार्या बियाणे व खतांच्या किमतीतील वाढ यामुळे दुकानदारांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली असूनही शासनाकडून त्यांच्या हक्काचे कमिशन वेळेवर मिळत नसल्याने दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाने तातडीने थकीत कमिशनची देयके अदा करून दुकानदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. या निवेदनावर तालुका अध्यक्ष नागोराव सुर्वे, सचिव इर्शादभाई फारुकी, उपाध्यक्ष उत्तम राठोड, मनोज किर्तने यांच्यासह अनेक स्वस्त धान्य दुकानदारांच्या स्वाक्षर्या आहेत.

COMMENTS