कोपरगाव : मागील महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे धामोरीसह परिसरातील अनेक ठिकाणी वीज खांब वाकले असून काही ठिकाणी ते जमिनीला टेकल

कोपरगाव : मागील महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे धामोरीसह परिसरातील अनेक ठिकाणी वीज खांब वाकले असून काही ठिकाणी ते जमिनीला टेकले आहेत. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वीजतारा तुटून शेतात पडल्या आहेत, तर काही ठिकाणी त्या अजूनही लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. तीन आठवडे उलटूनही दुरुस्तीची कामे पूर्ण न झाल्याने आमदार आशुतोष काळे यांनी महावितरणच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
आमदार आशुतोष काळे यांनी मंगळवारी (दि. १६) धामोरीसह परिसरातील नुकसानग्रस्त भागाची नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी वाकलेले वीज खांब, जमिनीवर पडलेल्या तसेच लोंबकळणाऱ्या वीजतारा पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि संबंधित ठेकेदार यांना त्यांनी जाब विचारला. “तीन आठवडे उलटूनही दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. केवळ कार्यालयात बसून शेतकरी आणि वीज ग्राहकांच्या अडचणी समजणार नाहीत. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करा आणि तातडीने कामे पूर्ण करा,” अशा कडक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणकडून अत्यल्प मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील कामासाठी केवळ दोन-तीन कामगार नेमून चालणार नाही. आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध करून देऊन हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, त्यांनी कार्यकारी अभियंत्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत अतिरिक्त साहित्य आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.
लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने रवंदे, मळेगाव थडी, सांगवी भुसार, मायगाव देवी आणि धामोरी येथील वाकलेले वीज खांब तसेच लोंबकळणाऱ्या वीजतारांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आ. काळे यांनी दिले आहेत.

COMMENTS