कर्जत : ‘स्वच्छ नदी, सुंदर कर्जत’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत कर्जत शहरात वेडी बाभूळ हटविण्याच्या मोहिमेचा उत्साहात प्रारंभ करण्यात आल

कर्जत : ‘स्वच्छ नदी, सुंदर कर्जत’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत कर्जत शहरात वेडी बाभूळ हटविण्याच्या मोहिमेचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. सर्व सामाजिक संघटना, सुरेशकाका सराफ पेढी आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कर्जत तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांच्या हस्ते लेंडी नदीपात्रात श्रीफळ (नारळ) फोडून या मोहिमेचा रीतसर शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमामागे सुरेशकाका सराफ पेढीचे सचिन कुलथे आणि ओम कुलथे यांची संकल्पना असून, नदी संवर्धनाबरोबरच शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा त्यामागील मुख्य उद्देश आहे. या प्रसंगी रोटरी क्लब, वैद्यकीय संघटना, मिरजगाव श्रमदान प्रतिष्ठान, व्यापारी संघटना, समर्थ विद्यालयाचे शिक्षक तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, याच दिवशी कर्जतमधील सर्व सामाजिक संघटनांच्या सलग श्रमदानाचा २१०० वा दिवस पूर्ण झाला. या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून नदी संवर्धनाच्या या व्यापक मोहिमेला सुरुवात करण्यात आली. अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या अविरत श्रमदानामुळे कर्जतमध्ये सामाजिक बांधिलकीचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ निर्माण झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
उद्घाटन प्रसंगी झालेल्या मनोगतांमध्ये विविध वक्त्यांनी २१०० दिवसांच्या सातत्यपूर्ण श्रमदानाचे कौतुक केले, तसेच नदी संवर्धनासाठी सुरेशकाका सराफ पेढीकडून मिळालेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी विजय तोरडमल यांनी मोहिमेच्या पुढील रूपरेषेची माहिती दिली. तर अविनाश पुराणे, संदीप काळदाते, गणेश जेवरे, धनराज राणे आणि निलेश दिवटे यांनी आपले मनोगत व्यक्त करून पर्यावरण संवर्धनासाठी अशा लोकसहभागातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या मोहिमेअंतर्गत समर्थ बंधारा, कुळधरण रस्ता ते श्री नागेश्वर मंदिर आणि कापरेवाडी रस्ता पुलापर्यंत नदीपात्र व नदीकाठावरील वेड्या बाभळी हटवून संपूर्ण परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ‘निसर्ग वाचवा, नदी वाचवा, स्वच्छ नदी – सुंदर कर्जत ही आपली जबाबदारी’ असा मोलाचा संदेश देण्यात आला.
या पर्यावरणपूरक उपक्रमात कर्जतकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन विजय तोरडमल यांनी केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विशाल म्हेत्रे यांनी केले, तर नितीन देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS