Homeताज्या बातम्या

पाय बांधून १० गोऱ्हे मैदानात टाकले; राहुरी फॅक्टरी येथील धक्कादायक घटना, नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी परिसरात मुक्या जनावरांप्रती अमानुष वागणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तींनी दहा गोऱ्ह्यांचे (

रात्री डीजेवर बंदी; राहुरी पोलिसांची कठोर भूमिका 
राहुरी पोलीस ठाण्याच्या कारागृहात दारूचा शिरकाव? जेवण पुरवठादाराविरुद्ध गुन्हा, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या    

देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी परिसरात मुक्या जनावरांप्रती अमानुष वागणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तींनी दहा गोऱ्ह्यांचे (बैल/गायींची लहान वासरे) पाय बांधून त्यांना मोकळ्या मैदानात टाकून दिल्याची घटना नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या क्लबगृहामागील मैदानात घडली. सुदैवाने, नागरिकांच्या सतर्कतेमुळे या सर्व गोऱ्ह्यांचे प्राण वाचले आहेत.

सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी गेलेल्या सलीम पठाण यांच्या निदर्शनास हा प्रकार सर्वात आधी आला. मैदानात पाय बांधलेल्या अवस्थेत पडलेल्या आणि हालचाल करण्यास असमर्थ असलेल्या गोऱ्ह्यांची दयनीय अवस्था पाहताच त्यांनी तातडीने राहुरी पोलिसांना तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेला याविषयी माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिस हवालदार नदीम शेख व सतीश कुऱ्हाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनीही तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निमसे यांनी गोऱ्ह्यांची तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक उपचार केले.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व गोऱ्ह्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांना राहुरी फॅक्टरी येथील गोपाळकृष्ण गोशाळेचे ललित चोरडिया यांच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आले.

या क्रूर घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून मुक्या जनावरांशी अमानुष वागणूक करणाऱ्या संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, हे गोऱ्हे येथे कोणी आणि कोणत्या उद्देशाने आणून सोडले, याचा शोध घेतला जात आहे.

या घटनेमुळे भटक्या व निराधार जनावरांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून मुक्या जीवांप्रती संवेदनशीलता जपण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

COMMENTS