नांदेड : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी

नांदेड : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी महायुतीकडे आवश्यक संख्याबळ असल्याने ही जागा भाजपच्या पारड्यात पडणार असल्याचा ठाम दावा केला. महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे चांगल्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खा. चव्हाण म्हणाले की, महायुतीची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट असून निवडणुकीत विजयासाठी आवश्यक असलेले संख्याबळ त्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार विजयी होणार, याबाबत कोणतीही शंका नसल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षांतील परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आणि संभ्रमाचे वातावरण असल्याचे म्हटले. काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर तसेच अलीकडील राजकीय घडामोडींमुळे विरोधी मतदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. विरोधकांमधील मतभेद आणि विसंवादाचा राजकीय फायदा महायुतीला होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत घडामोडींविषयी विचारण्यात आले असता, तो संबंधित पक्षाचा अंतर्गत विषय असून भाजपचा त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी यावर अधिक भाष्य टाळले. यावेळी भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत बोलताना, महायुतीच्या विचारांशी सहमत असलेले अन्य पक्ष किंवा नेते सहभागी होण्यास इच्छुक असतील, तर त्यांचे स्वागत करण्यात येईल, असे सांगून महायुतीचे संख्याबळ आणखी बळकट होईल, असा विश्वासही खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.

COMMENTS